आई- वडिल आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतात. पण, स्वत:च्याच मुलांना कोणी घरात डांबून ठेवल्याचं ऐकलंय का? अमेरिकेतल्या लॉस एंजेलिसमधून आपल्या मुलांना घरात डांबून ठेवणाऱ्या माता पित्याला नुकतीच पोलिसांनी अटक केली असून या दोघांनी आपल्या २ वर्षांपासून ते २९ वर्षांपर्यंतच्या १३ मुलांना एका घाणेरड्या घरात डांबून ठेवलं होतं. खाण्यापिण्याची अबाळ झाल्यानं ही सर्व मुलं पोलिसांना कुपोषित अवस्थेत आढळली.
डेव्हीड एलेन तुर्पिन आणि लुईस ऐना तुर्पिन अशी या दोघांची नावं असून मुलांचं शोषण केलं म्हणून पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. डांबून ठेवलेल्या घरातून एक मुलगी पळून जाण्यास यशस्वी झाली आणि तिनेच आपल्या इतर भाऊ बहिणींना घरात डांबून ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर तातडीनं पोलीस या परिसरात पोहोचले. जेव्हा पोलीस या घरात पोहोचले तेव्हा त्यांना मोठा धक्काच बसला कारण, या घरात १३ मुलांना साखळीनं बांधून ठेवलं होतं. हे घर अक्षरश: गलिच्छ होतं, इतकंच नाही तर या मुलांना खाणं पिणं नीट मिळत नसल्यानं ती कुपोषित झाली होती. काही मुलं तर अंधारात पलंगाला बांधलेल्या अवस्थेत होती.
या सर्व मुलांना पोलिसांनी वाचवलं असून त्यांच्या आई वडिलांची रवानगी तुरूंगात केली आहे. या मुलांची प्रकृती खालावलेली असल्यानं या सर्व मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तुर्पिन कुटुंब काहीवर्षांपूर्वीच कर्जबाजारी झाले होते. डेव्हिड हे इंजिनिअर आहेत. या मुलांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांना ५ वर्षांपासून कोणाही पाहिले नव्हते. या आई- वडिलांनी स्वत:च्या मुलांना घरात डांबून त्यांचा छळ का केला हे मात्र पोलिसांना अद्यापही समजू शकले नाही.