बहिण-भावाच्या अतूट नात्याची उदाहरणे आपण अनेकदा पाहतो. भाऊ आपल्या बहिणीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जिवाचे रान करतो. ती सुखी राहावी, त्यासाठी प्रसंगी तो स्वतः आपले मन मारतो मात्र तिला काहीही कमी पडू देत नाही. अशीच एक अनोखी घटना पाहून तुमचेही मन भरुन येईल. लहान मुले आपल्या पॉकेटमनीतील काही रक्कम बाजूला टाकतात. तशीच जयपूरमध्ये राहणाऱ्या १३ वर्षांच्या यशनेही लहानपणापासून काही रक्कम साठवली. आता जमवलेल्या रकमेतून काय घ्यायचे म्हटल्यावर या चिमुकल्याने त्या रकमेतून आपल्या बहिणीसाठी दुचाकी घेण्याचे ठरविले.

यातील विशेष बाब म्हणजे त्याने साठवलेली सगळी रक्कम नाण्यांच्या स्वरुपात होती. आता लहान मुलाने जमवलेली रक्कम म्हणजे किती असेल असे तुम्हाला वाटते? तर ही रक्कम थोडीथोडकी नव्हती, ती तब्बल ६२ हजार रुपये होती. यश ही सगळी रक्कम घेऊन ‘होंडा’च्या शोरुममध्ये गेला आणि त्याने आपल्याला दुचाकी खरेदी करायची असल्याचे सांगितले. संध्याकाळी शोरुम बंद होण्याची वेळ असल्याने आणि लहान मुले असल्याने सुरुवातीला या मुलांकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र त्यांच्या हातातील पैशांच्या दोन बॅग पाहून शोरुममधील कर्मचारीही काहीसे गोंधळले. यशने आपण आणि बहिणीने मिळून लहानपणापासून ही रक्कम जमवली असून आपल्याला त्यातून दुचाकी खरेदी करायची असल्याचे त्यांना सांगितले.

आम्हाला दोघांना लहानपणापासून मिळणाऱ्या पॉकेटमनीमधून आम्ही ही रक्कम साठवली असल्याचे त्याने सांगितले. ही रक्कम मोजण्यासाठी शोरुममधील कर्मचाऱ्यांचे तब्बल दोन तास खर्च झाले. अनेक मोठे लोकही दुचाकी खरेदी करायला आल्यावर एकावेळी पूर्ण रक्कम भरु शकत नाहीत. मात्र ही स्पेशल केस असून, या इतक्या लहान मुलांनी पूर्ण रक्कम दिली हे खरेच कौतुकास्पद आहे, असे शोरुमच्या डिलरने सांगितले.

Story img Loader