दिवाळीत दिव्यांची रोषणाई करून आपण आपले घर सजवतो त्यावेळी असेही काही असतात जे अंधाराने भरलेल्या एखाद्याच्या आयुष्यात रंग भरण्याचा प्रयत्न करतात. मुंबईत राहणारी क्षीरजा राजे ही त्यापैकीच एक. आपल्या इवल्याशा हातने कंदील बनवून त्यातून येणा-या पैशातून रस्त्यावर राहणा-या गरीब आणि अनाथ मुलांच्या आयुष्यात आनंद वाटण्याचे काम क्षीरजा करते. क्षीरजा फक्त १३ वर्षांची आहे. छोट्या श्रीरजाच्या आभाळाएवढ्या मनाची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.
नेहमीच जेवणात नावडती भाजी आईने बनवलेली म्हणून आईवर रुसून बसणा-या क्षीरजाला तिची आई एकदा घरामागे असणा-या झोपडपट्टीत घेऊन जाते. क्षीरजाच्या वयाची अनेक मुले तिथे असतात. मिळेल ते खाऊन पोट भरणारी, वेळप्रसंगी पोटाला चिमटा काढून उपाशीच झोपणारी. छोट्या क्षीरजाने जेव्हा हे पाहिले तेव्हा कोवळ्या वयात तिला खरी परिस्थिती कळली. काही दिवसांनी क्षीरजाने आपल्या हाताने कंदील बनवून विकायला सुरूवात केली. प्रत्येकी पाच रुपये कंदीलची किंमत ठरवून तिने ते कंदील शेजारी पाजारी, मित्र मैत्रिणींना विकले त्यातून जे काही पैसे मिळाले त्याची दिवाळी दिवशी तिने मिठाई घेतली आणि गरीब मुलांना वाटली. त्यादिवशी त्या गरीब मुलांना मिठाई खाताना पाहून क्षीरजाला जे काही समाधान मिळाले ते खूपच मोलाचे होते. तेव्हापासूनच दरवर्षी हस्तकलेच्या विविध वस्तू बनवून त्यातून जे पैसे येतील त्याने गरीब मुलांची दिवळी आनंदात साजरी करण्याचा निर्णय तिने घेतला.
दरम्यानच्या काळात तिला या उपक्रमात सतत प्रेरणा देणा-या तिच्या आईला कॅन्सर झाला. आपले सारे जगच संपले असे वाटून हताश झालेल्या क्षीरजाला आईने बळ दिले. २०१३ मध्ये श्रीरजाने क्विलींगच्या बाहुल्या आणि इतर वस्तू बनवून विकल्या त्यातून तिला ३० हजार रुपये मिळले. हे सारे पैसे क्षीरजाने कॅन्सरग्रस्त रुग्णासाठी दान केले. टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमधल्या कॅन्सरग्रस्त मुलांसाठी हस्तकलेच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा क्षीरजाने घेतली. आपल्याला रस्त्यावर राहणा-या गरिब मुलांसाठी काहीना काही करायचे आहे असे छोटी क्षीरजा सांगते. कोणत्याच मुलाला मला उपाशीपोटी झोपलेले पाहायचे नाही त्यामुळे माझे स्वप्न जोपर्यंत प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत मी काम करत राहणार असेही क्षीरजाने बोलून दाखवले. ह्युमन्स ऑफ बॉम्बेने आपल्या फेसबुकपेजवर क्षीरजाची गोष्ट लिहली आहे.