पाकिस्तानच्या मलाला यूसुफजईने वयाच्या १७ व्या वर्षी शांततेच्या नोबेल पुरस्कारावर मोहोर उमटवली होती. त्यानंतर आता एका १६ वर्षीय मुलीला शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. जर तिला हा पुरस्कार मिळाला तर ती सर्वात कमी वयाची नोबेल विजेती ठरेल. स्वीडनमध्ये वास्तव्य करणाऱ्या या मुलीचे नाव ‘ग्रेटा थूंबर्ग’ असे आहे. नॉर्वेतील तीन खासदारांनी ‘ग्रेटा थूंबर्ग’ची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

अनधिकृत वृक्षतोड, हवा प्रदुषण, तापमान वाढ अशा पर्यावरणाच्या समस्यांवर आंदोलन छेडणाऱ्या ग्रेटा थूंबर्गला शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. ‘ग्रेटा थूंबर्ग’ ही १६ वर्षीय पर्यावरणप्रेमी मुलगी आहे. ‘अस्पर्जर सिंड्रोम’ या आजाराने ग्रस्त असलेल्या ग्रेटाने गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात स्वीडनच्या संसदेसमोर पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी एक आंदोलन केले होते. हे आंदोलन ‘फ्रायडे फॉर द फ्युचर’ या नावाने चर्चेत आले. या आंदोलनामुळे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी तिची दखल घेतली.

हवामान बदलासमोर आपण अपयशी ठरलो आहोत, हे मान्य करावे लागेल, असे म्हणत दावोस इथल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्येही तिने हवामान बदलावर आपली भूमिका मांडली. ग्रेटाचे ‘फ्रायडे फॉर द फ्युचर’ हे आंदोलन जवळपास १०० देशांत पोहोचले. तिच्या आंदोलनानंतर लगेचच जर्मनी, बेल्जियम, ब्रिटन, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांमध्येही पर्यावरण वाचवण्यासाठी आंदोलने केली गेली.

Story img Loader