जंगलामधून जाणा-या रस्त्यावर वाहुतूकीची कोंडी. पुढे काय झालायं सगळ्यांना उत्सुकता. झाड वगैरे कोसळंल, रस्ता खचलाय असाही प्रकार नाही.. मग मागच्या गाड्या पुढे का जात नाहीत? चालकांना पडलेला सवाल.. शेवटी उत्सुकतेपोटी गाड्यांच्या काचा खाली करून अनेकांनी डोकावून पाहण्याचा प्रयत्न केला अन् जे पाहिले ते पाहून जंगलात आलोय याचे सार्थक झाले असे बोलून धन्यता मानली. आता तुम्ही म्हणाल एवढ पाहिलंय तरी काय? कारण या सगळ्यांना पाहायला मिळाला तो एक दोन नव्हे तर १८ सिंह सिंहिणांचा झुंड. आता साक्षात जंगलाचा राजा सहकुंटुंब भर रस्त्यात भोजन करत असेल तर त्याला हुसकावून लावायची कोणाची काय बिशाद. त्यामुळे हे जंगलाचे शाही कुटुंब आपला भोजन समारंभ आटपत नाही तोपर्यंत सगळ्यांना आपल्या गाड्या रस्त्यातच थांबवाव्या लागल्या.

VIDEO : एकमेकांपासून दुरावलेल्या आई आणि पिलांची अनोखी भेट!

आफ्रिकेच्या क्रुगर राष्ट्रीय उद्यानात एक दुर्मिळ प्रकार पर्यटकांना पाहायला मिळाला. या उद्यानातून जाणा-या रस्त्यावर एक दोन  नाही तर तब्बल १८ सिंह आणि सिहिंणी सावजावर ताव मारत होते. काही वेळापूर्वीच जंगलातून त्यांनी रेड्याची शिकार केली होती.  ही शिकार त्यांनी फरफटत रस्त्यावर आणली होती. भर रस्त्यात हे शाही कुटुंब आपल्या भोजनाचा आनंद घेत होते. अशा मिजाशित ते शिकारीचा पडशा पाडत होते की मागे वाहतूकीची कोंडी झालीय याची जराही पर्वा त्यांना नव्हती. हे जंगल आहे आणि येथे माणसांची नाही तर राजाची दहशत असते अशा आवेशात हे १८ सिंह येथे आरामात बसून होते. जंगलातल्या रस्त्यावरच हे सिंह बसले असल्याने रस्त्यात मात्र वाहतूकीची चांगलीच कोंडी झाली. एकतर असा दुर्मिळ योग जंगल पालथं घातलं असते तरी याची डोळा याची देह पाहता आला नसते म्हणून हे दुर्मिळ क्षण काहींनी कॅमेरात कैद केले. तर काहींनी या शाही परिवाराला फारसा त्रास न देता  मार्ग निघेल तिथून आपली गाडी काढण्याचा प्रयत्न केला.

वाचा : ऐकावे ते नवलच!…म्हणून उंदराला दिली शिक्षा

Story img Loader