आपल्या पोटचा मुलगा प्रत्येकालाच प्रिय असतो. मग आपले लाडके मूल आपल्या डोळ्यासमोरुन काही काळ जरी दूर झाले तरी आई-वडिलांची होणारी अवस्था न सांगितलेलीच बरी. दिल्लीतील अलीपूर येथे राहणारे शोकत अली मागच्या १८ वर्षांपासून आपल्या हरवलेल्या मुलाचा शोध घेत होते. २००० सालापासून त्यांचा मुलगा जावेद हरवला होता. तेव्हा तो १४ वर्षांचा होता. त्याचा शोध घेण्यासाठी त्याचे वडिल सलग १८ वर्षं देशाच्या कानाकोपऱ्यात फीरत होते. प्रत्येक ठिकाणी पोलिस स्टेशन आणि बालसुधारगृह याठिकाणी जाऊन ते त्याची चौकशी करत होते. मात्र दरवेळी त्यांच्या हाती केवळ निराशाच येत होती. कधीतरी आपला मुलगा सापडेल ही वेडी आशा अली यांना होती. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच असावे त्याचप्रमाणे एक दिवस त्यांच्या आयुष्यात आला आणि त्यांना धक्का बसला.

दिल्लीतील त्यांच्या घराजवळ असणाऱ्या एका टाकीत त्यांना निळा शर्ट आणि खाकी पॅंट असलेला एक पुरुषाचा सांगाडा मिळाला. त्याच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, जावेद जेव्हा हरवला तेव्हा त्याच्या अंगावर हेच कपडे होते. त्यामुळे हा सापळा त्याचाच असल्याचे म्हटले जात आहे. मात्र तो त्याचाच आहे यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पोलिस या सापळ्याची डीएनए तपासणी करणार आहेत. याबाबत जावेदचे वडिल म्हणाले, मला वाटले जावेदला बालमजूरी करायला लावली असेल. नाहीतर अपहरणकर्त्यांनी त्याला अशाठिकाणी सोडले असेल की जिथून त्याला पुन्हा घरी येता येत नाही. त्यामुळे मी मुंबई, चंदीगड, पटना, कोलकाता याठिकाणच्या बालसुधारगृहात त्याला शोधण्याचा प्रयत्न केला.

त्याचे अपहरण केल्याचे समजले असते तर त्याची सुटका करण्यासाठी मी माझी पूर्ण संपत्ती विकायला तयार होतो असेही अली यांनी सांगितले. एकदाच आम्हाला अनोळखी लोकांचा फोन आला मात्र त्यानंतर काहीच फोन न आल्याने आम्हाला काय करायचे कळलेच नाही. जावेद याची बहीण जायदा म्हणाली, अनोळखी व्यक्तीने केलेल्या एका फोननंतर पुन्हा काहीच फोन आला नसल्याचे तिनेही सांगितले. तेव्हा आमच्या भागात एकांकडेच फोन होता. त्यांनी आमच्या घरी येत जावेदसाठी फोन आहे असे सांगितल्यावर वडिल फोन घ्यायला गेले. त्यावेळी तुमच्या भावाचे कर्ज फेडल्यानंतरच मी याला सोडेन असे त्याने हरियाणी भाषेत सांगितले. त्यानंतर आपले काकाही गायब झाल्याचे ती म्हणाली.