आपल्या बचावासाठी कोण कधी काय करेल सांगता येत नाही. मुंबईमध्ये नुकतीच एक घटना घडली असून यामध्ये १८ वर्षाच्या तरुणाने दंड भरावा लागू नये म्हणून थेट मेट्रो स्टेशनमधून उडीच मारली. त्याने ज्याठिकाणहून उडी मारली ते ठिकाण ३० फूट उंचीवर होते. याहूनही कमाल म्हणजे इतक्या उंचावरुन उडी मारुनही हा युवक सुरक्षित आहे.

मूळ ओडिसामधील असलेल्या राजकुमार याने हे कृत्य केले आहे. राजकुमार टाईल्स लावण्याचे काम करतो. त्याच्या सांगण्यानुसार तो साकी नाका येथे मेट्रोमध्ये चढून घाटकोपरला आला. त्यावेळी स्टेशनबाहेर येण्यासाठी त्याने मशीनमध्ये टोकन टाकले. मात्र ऑटोमॅटीक फेयर कलेक्शनचे गेट न उघडल्याने त्याने यावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून सुरक्षारक्षकांनी त्याच्यादिशेने धाव घेतली आणि त्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो मेट्रोच्या तिकिटाच्या भागात आला. त्याठिकाणी त्याला रेल्वे कर्मचाऱ्य़ांनी फाईन देण्यास सांगितले.

त्याला कस्टमर केअर विभागात नेत असताना सुरक्षारक्षकांच्या तावडीतून सुटून त्याने मेट्रो स्टेशनच्या तिसऱ्या मजल्यावरुन रस्त्यावर उडी मारली. रस्त्यावर लोकांनी एकच गर्दी केली आणि रात्री घाटकोपर पोलिसांच्या मदतीने त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतक्या उंचीवरुन पडल्याने राजकुमारच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाले. तर हनुवटीलाही टाके पडले. रुग्णालयाच्या अहवालामुसार त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

त्याच्याकडे टोकन असूनही मेट्रो स्टेशनमधील गेट का उघडले गेले नाही असे रेल्वे अधिकाऱ्यांना विचारण्यात आले. तेव्हा टोकन घेतल्यापासून एक तासाच्या आत मेट्रोचा प्रवास करावा लागतो. अन्यथा ते टोकन बाद होते. राजकुमारने स्टेशनवर बराच वेळ घालवल्याने त्याचे टोकन बाद झाले आणि तो घाटकोपरला गेट उघडू शकला नाही.