18 Year Old Student Dies Due To Silent Heart Attack In Indore: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजा लोधी असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. बुधवारी (१७ जानेवारी) इंदूरमधील खासगी कोचिंग क्लासमध्ये शिकत असताना अचानक तो चक्कर येऊन बेंचवर कोसळला. यावेळी मित्रांनी त्याला रुग्णालयात नेले, मात्र तिथे पोहचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या धक्कादायक घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
राजा इंदूरमध्ये ‘मध्य प्रदेश लोकसेवा आयोग’ (MPPSC) साठी तयारी करत होता. दरम्यान, १७ जानेवारी रोजी तो नेहमीप्रमाणे कोचिंग क्लासमध्ये बसला असताना अचानक तो बेशुद्ध पडला. यावेळी त्याच्या मित्रांनी लगेच त्याला मदत केली. पण, तो पुन्हा बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळला. या घटनेमुळे क्लासमध्ये काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्याच्या मित्रांनी त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, तरी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजाला हॉस्पिटलमध्ये पोहोचायला फक्त ७ मिनिटे लागली, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. इंदूरमधील माधव कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये ही घटना घडली. डॉक्टरांनी त्याला तातडीने आयसीयूमध्ये दाखल केले, मात्र तरीही त्याला वाचवता आले नाही.
प्रवासादरम्यान अडचणी आल्यास घाबरु नका, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा अन् करा चिंतामुक्त प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, राजा लोधी इंदूरच्या सर्वानंद नगरमध्ये राहत होता. तो बीएच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता. याबरोबरच तो माधव कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून एमपीएससीची तयारीही करत होता. ही घटना बुधवारी दुपारी १२.४९ वाजता घडली.
पोलिसांनी सांगितले की, राजाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले आहे. राजाच्या मृत्यूचे कारण सायलेंट हार्ट अटॅक असल्याचे सांगितले जात आहे. सायलेंट हार्ट अटॅक ही अशी स्थिती आहे, ज्यामध्ये हृदयाचे कार्य अचानक थांबते. परंतु, त्या व्यक्तीला कोणतीही वेदना किंवा इतर लक्षणे जाणवत नाहीत. पण राजाच्या निधनाच्या बातमीने त्याच्या कुटुंबीय आणि मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.