Parag Patil Olympian : प्रतिभावान कलावंत, खेळाडू काळाच्या ओघात आपली ओळख हरवून बसतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आज हलाखीचं जीवन जगत आहेत. उदरनिर्वाहासाठी त्यांना खेळाव्यतिरिक्त इतर कामे करावी लागत आहेत. असाच एक प्रकार आता मुंबईतून समोर आला आहे. भारतासाठी दोन सुवर्ण, ११ रौप्य आणि ३ कांस्य पदक जिंकणारे पराग पाटील आज मुंबईच्या रस्त्यावर ओला टॅक्सी चालवत आहेत. मुंबईतील तरुण उद्योजक आर्यसिंग कुशवाह यांनी या पराग पाटील यांचा माग काढला. त्यांनी लिंक्डइनवर याविषयी सविस्तर लिहिलं आहे.
आर्यनसिंग कुशवाह यांनी लिहिलं की, “माझा ओला चालक ऑलिम्पिअन आहे. पराग पाटील, ज्येष्ठे ऑलिम्पिअन. तिहेरी उडीत आशिया खंडात दुसरे स्थान मिळवलेले आणि लांब उडीत आशिया खंडात तिसरे ठरलेले पराग पाटील. प्रत्येकवेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. ते कधीच रिकाम्या हाताने परतले नाहीत. त्यांनी २ सुवर्ण, ११ रौप्य आणि ३ कांस्य पदक पटकावले आहत. तरीही त्यांच्याकडे कोणतेही आर्थिक साधन नाही. त्यांच्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी पुरेसा निधी नाही. त्यांना त्यांच्या अॅथलेटिक करिअरवर पाणी सोडावं लागलं. पराग यांना जो कोणी मदत करू शकेल, त्या प्रत्येकासाठी ही पोस्ट आहे. जेणेकरून पराग पुन्हा भारताचं प्रतिनिधित्व करून आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला विजयी करतील.”
पोस्टवर कमेंट्सचा पाऊस
या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटलंय की, ही खरी समस्या आहे. आपल्याकडे अनेक प्रतिभा व्यवस्थापन एजन्सी आहेत, पण क्रीडा क्षेत्रातील पुरुष आणि महिलांसाठी अशा यंत्रणा नाहीत.”, तर दुसऱ्याने म्हटलंय की, आपले क्रीडा दिग्गज पात्र आहेत. आपल्याला राष्ट्र म्हणून पुढे येण्याची गरज आहे.” “हा माणूस खूप पात्र आहे. पण माहित नाही अॅथलीट्स असे का संपतात?” असंही एकाने विचारलं आहे.