स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. तितकेच दृढ नाते आपले ‘सेल्फी’शी जुळले आहे. प्रसंग कोणताही असो, ठिकाण कुठलेही असो आपल्या मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याची ‘लेन्स’ तो क्षण/ठिकाण आपल्यासकट ‘कॅप्चर’ करण्यासाठी सदैव तत्पर असते. तरुणवर्गात तर विनाकारण ‘सेल्फी’ काढण्याची हौस दिसून येते. मात्र, आता या सेल्फीने प्राण्यांनाही भुरळ घातली आहे. काँगोमधील विरुंगा नॅशनल पार्कमध्ये असलेल्या दोन गोरिलांना या सेल्फीचं क्रेझ लागलं आहे. त्यामुळे जर तुम्ही त्यांच्यासमोर तुमच्या फोनचा कॅमेरा सुरु केला तर नक्कीच त्या सुंदर अशा पोज देताना दिसून येतील. सध्या या दोन्ही गोरिलांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काँगोमधील विरुंगा नॅशनल पार्कमध्ये नकाजी आणि नेजे नामक दोन स्त्री जातीच्या गोरिला आहेत. हे दोघंही सेल्फीच्या प्रेमात पडले असून फोटो काढताना ते दोघही एकापेक्षा एक सरस पोज देताना पाहायला मिळतात. या नॅशनल पार्कमध्ये असलेल्या रेंजरने याच्यासोबत एक फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोन्ही गोरिलांनी माणसांसारखी पोज दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यांचा हा फोटो सेंकवेंक्वे सेंटरमध्ये काढण्यात आला आहे.

“नकाजी आणि नेजे हे दोन्ही गोरीला फोटो काढतांना माणसांप्रमाणे पोज देतात. विशेष म्हणजे सेल्युट करताना आपण ज्याप्रमाणे उभं राहतो. त्याप्रमाणेदेखील ते उभे राहतात. परंतु त्यांचं एक वैशिष्ट आहे. त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी अनेक मिन्नतवाऱ्या कराव्या लागतात. कोणत्याही फोटोसाठी त्या सहजासहजी तयार होत नाहीत. मात्र जर त्यांना स्वत: फोटो काढायची इच्छा असेल तर त्या स्वत:हून उठून उभ्या राहतात”, असं नॅशनल पार्कचे डेप्युटी डायरेक्टर मुरानुम्वे यांनी सांगितलं.

विरुंगा नॅशनल पार्कनेही त्यांचा हा फोटो शेअर केला आहे. “हे दोघंही केवळ फोटो काढण्यातच पटाईत नाही. तर अॅक्टींग करण्यातही तरबेज आहेत. कॅमेरा दिसल्यानंतर त्या वेगवेगळ्या पोज देता. त्यांना पोज शिकवाव्या लागत नाहीत”, असं विरुंगा नॅशनल पार्कच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, सध्या या दोघांचा सेल्फी चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर या फोटोला ४२ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. या दोघींनाही २००७ मध्ये या नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांचं वय अनुक्रमे २ आणि ४ महिने होतं. तेव्हापासून त्यांचा त्यांच्या रेंजर्ससोबत चांगलं नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे ते आपल्या रेंजर्ससोबत एखाद्या कुटुंबियांप्रमाणेच वागतात. याच कारणास्तव त्या कायम आपल्या रेंजर्सबरोबर फोटो काढण्यासही तयार असतात.

 

Story img Loader