वर्षानुवर्षे पूर्वीचे मानवाचे आणि प्राण्यांचे अवशेष सापडणे हे म्हणावे तितके नवीन नाही. पण एक दोन नाही तर तब्बल २० कोटी वर्षांपूर्वीचे एखाद्या प्राण्याचे अवशेष सापडणे ही नक्कीच विशेष बाब आहे. ऐकून खरे वाटणार नाही, पण दक्षिण आफ्रिकेत २० कोटी वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत. आता हे प्राणी कोणते याबाबत तुमच्या मनात नक्कीच उत्सुकता असेल. तर हे प्राणी २० कोटी वर्षांपुर्वीचे असल्याने तुम्ही-आम्ही कधीच पाहिलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेमध्ये हे अवशेष सापडले असून ते मगर आणि सिंह या दोन्ही प्राण्यांची छाप असणारा हा प्राणी असल्याचे समोर आले आहे. एएफपी या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
आफ्रिकेतील खडकाळ भागात अतिशय अवघड अशी चढाई केल्यावर काही खडकांवर संशोधकांना हे अवशेष सापडले आहेत. आम्हाला याठिकाणी काही अवशेष सापडण्याची शक्यता असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही खोदाई सुरु केली. त्यावेळी आम्हाला २००५ मध्ये अचानक याठिकाणी काही हाडे मिळाली. या हाडांचे प्रयोगशाळेत नेऊन परिक्षण करण्यात आले. त्यावेळी तो भाग त्या प्राण्याचा पार्श्वभाग असल्याचे लक्षात आले. अशाप्रकारचा प्राणी कोणीच कधी पाहिला नसल्याचे या संशोधनातून आमच्या लक्षात आले असे अमेरिकेतील एका संशोधकाने सांगितले. त्यावेळी हा मांसभक्षण करणारा आणि सर्व प्राण्यांमध्ये प्रबळ असणारा प्राणी होता. हा प्राणी जगात सगळ्याठिकाणी असल्याची नोंद असली तरीही दक्षिण आफ्रिकेत मात्र त्याची नोंद नाही.
मागच्या काही वर्षात पुरातत्व विभागातील संशोधकांना विविध प्रकारचे अवशेष सापडत असून संशोधनाच्यादृष्टीने ही अतिशय आनंदाची बाब आहे. याबरोबरच दक्षिण आफ्रिका हे डायनॉसॉरशी निगडीत अवशेष सापडण्यामध्ये सध्या सर्वात आघाडीवर असल्याचेही बोलले जात आहे. आता सापडलेल्या अवशेषांचा प्राणी नेमका कसा होता याबाबत अद्याप नेमकी माहिती मिळाली नसून संशोधनानंतर याबाबतच्या गोष्टी स्पष्ट होतील असे सांगण्यात आले आहे.