गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नेहमी वेगवेगळ्या अतरंगी रेकॉर्ड्सची नोंद होत असते. सगळ्यात मोठे केस, काही सेकंदांत जास्तीत जास्त नारळ फोडणे, पत्त्यांची रचना करून प्रसिद्ध इमारतींची रचना करणे, पाण्याखाली जाऊन जादू दाखवणे आदी अनेक खास गोष्टींची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्यात येते. आज सोशल मीडियावर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सकडून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे; ज्यात एका २६ वर्षाच्या आईला सर्वाधिक दात असल्याचा किताब देण्यात आला आहे.
भारतीय महिलेचे नाव कल्पना बालन असे आहे. तिची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद करण्यात आली आहे. कारण- तिला इतरांपेक्षा सहा दात जास्त म्हणजेच सर्वाधिक असे ३८ दात आहेत. आपल्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाल्याचा आपल्याला खूप जास्त आनंद झाला, असे कल्पनाने सांगितले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स यांनी शेअर केलेली ही पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा बघाच.
हेही वाचा…बापरे! २० लाखांच्या नोटांचा हार घालून घराच्या छतावर चढला व्यक्ती; पुढे नेमकं काय झालं? पाहा VIDEO
पोस्ट नक्की बघा :
कल्पनाचे किशोरवयात तोंडातील एक-एक करून दात वाढू लागले. तिला या सहा दातांमुळे कोणताही त्रास होत नव्हता. पण, जेवताना वारंवार अन्न या दातांमध्ये अडकायचे. त्यामुळे तिच्या पालकांनी तिला दात काढून टाकण्याचा सल्ला दिला. पण, तिचे हे दात काढणे कठीण होते. म्हणून महिलेला तिच्या डॉक्टरांनी या दातांची थोडी वाढ होऊ देत, असा सल्ला दिला. त्यानंतर मग महिलेने हे सहा दात न काढण्याचा निर्णय घेतला. कारण- तिला या दात काढण्याच्या प्रक्रियेची भीती वाटत होती. कल्पनाला तोंडाच्या आतमध्ये जबड्याच्या खाली चार; तर जबड्याच्या वर दोन एक्स्ट्रा दात आहेत.
सोशल मीडियावर ही पोस्ट गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या अधिकृत @GWR या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आहे. तसेच त्यांनी २६ वर्षीय कल्पना बालनचे कौतुक केले आहे आणि तिची माहिती पोस्टमध्ये शेअर केली आहे. सध्या सोशल मीडियावर या अनोख्या गोष्टीची चर्चा होताना दिसते आहे.