ग्रामीण भागांमध्ये राहणाऱ्या तीन भारतीयांनी जपानमध्ये अभिमानास्पद कामगिरी केली आहे. International Snow Sculpting Competition मध्ये उणे २५ डिग्री तापमानामध्ये बर्फापासून भगवान विष्णूचा अवतार असलेल्या नरसिंहाची मूर्ती साकारली. या स्पर्धेमध्ये भारतीयांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. रवी प्रकाश, सुनील कुमार कुशवाहा आणि रजनीश वर्मा अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या संघाचे नाव ‘अभ्युदय टीम इंडिया‘ असे आहे.
‘अभ्युदय टीम इंडिया‘च्या फेसबुक पेजनुसार, तब्बल १९ वर्षानंतर भारतीयांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे. कठीण परिस्थितीमध्ये मूर्ती साकारणाऱ्या भारतीय संघाला प्रथम तर रशियाच्या संघाला दुसरे पारितोषिक मिळाले आहे. थायलंड संघाला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. International Snow Sculpting Competition या स्पर्धेत दहा देशांनी सहभाग नोंदवला होता.
जपानमधील Nayoro मध्ये ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘अभ्युदय टीम इंडिया‘ने भगवान विष्णूची नरसिंह अवताराची प्रतिकृती साकारली आहे. स्पर्धक कलाकृती साकारताना उणे २५ डिग्री तापमान होते. पण मन न खचू देता भारतीयांनी चार मीटरची मूर्ती साकारली.
International Snow Sculpting Competition कसा असतो –
हिम वर्षामध्ये एखादी मुर्ती अथवा जबरदस्त कलाकृती तयार करावी लागते. ज्याची कलाकृती लवकर आणि उत्कृष्ट असेल अशा कलाकरांचा गौरव करण्यात येतो. ही स्पर्धा जपानमध्ये फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होते.