घरातील लोकांचे लक्ष नसताना कठड्यावरुन किंवा खिडकीतून लहान मूल पडल्याच्या घटना अनेकदा घडतात. अशीच एक घटना चीनमध्ये नुकतीच घडली आहे. मात्र या घटनेमध्ये शेजाऱ्याने खिडकीतून पडत असलेल्या मुलीला वाचवण्यात यश आले. पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकेल अशी ही दृश्ये कॅमेरातही कैद झाली आहेत. झियाओन शहरात एका रहिवासी इमारतीमध्ये आपल्या ३ वर्षांच्या मुलीला घरात ठेऊन तिची आई किराणा सामान आणण्यासाठी बाहेर गेली. खिडकीच्या ग्रीलमध्ये बसलेली मुलगी खेळत असताना अचानक ग्रीलमधून खाली पडली आणि अडकली. तिच्या रडण्याचा आवाज आल्यावर आजूबाजूच्यांना काहीतरी झाल्याचे लक्षात आले.

अशावेळी वेळ न दवडता आणि स्वतःच्या जीवाचा विचार न करता शेजारी राहणारे चेन फेंगोंग यांनी पुढाकार घेतला. अतिशय धाडसाने चेन मुलीचा जीव वाचविण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरील घराच्या खिडकीत चढले. अक्षरशः खिडकीत लटकतच त्यांनी तिला ग्रीलमधून वरती ढकलले. हा सगळा प्रकार सुरु असताना रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान सुरक्षादलालाही बोलविण्यात आले. विशेष म्हणजे मुलीला सुखरुपपणे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी चेन स्वतः आहेत त्याच अवस्थेत बराच काळ उभा होता. जवळपास अर्धा तास खिडकीमध्ये सुरक्षादलाची वाट पाहिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी मुलीला आणि या चेन यांना सुखरुप बाहेर काढले. यासाठी त्यांना खिडकीचे ग्रील तोडावे लागले.

कॅमेरात कैद झालेल्या व्हिडिओमध्ये शेजाऱ्याने लहान मुलीला कशाप्रकारे वाचविले ते दिसत आहे. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून लहान मुलीचा जीव वाचविण्याचे धाडस करणारा हा शेजारी म्हणजे खऱ्या अर्थाने शेजारधर्म पाळणाराच म्हणावा लागेल. काही वेळाने या मुलीची आई बाजारातून परत आल्यावर तिला घडला प्रकार लक्षात आला. तेव्हा मुलीला घेऊन सामान आणायला जाणे शक्य नसल्याने मी एकटीच गेले, मात्र अशाप्रकारे मुलीला एकटीला ठेवणे ही चूकच झाल्याचे तिने कबूल केले.

Story img Loader