‘स्त्री भ्रूण’ हत्येच्या घटनांमुळे काही काळापूर्वी बीड जिल्हा चांगलाच चर्चेत होता. जिल्ह्याची ही बदललेली प्रतिमा सुधारण्यासाठी येथील स्थानिक संघटना प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी याठिकाणी एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. १५ ऑक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत जन्म झालेल्या ३०६ मुलींचे बुधवारी एकाच मंडपात बारसे करण्यात आले. स्व.झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात हा उपक्रम पार पडला. राजयोग फाउंडेशन व कुटे ग्रुप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रकारचा उपक्रम मागच्या वर्षीही आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी १०१ मुलींचे सामूहिकरित्या नामकरण करण्यात आले होते. यावर्षी या अनोख्या उपक्रमासाठी ३०१ पालकांनी बारशासाठी नावनोंदणी केली होती. तर काही पालक ऐनवेळी आपल्याला यामध्ये सहभागी व्हायचे असल्याचे म्हणाले आणि ही आकडा ३०६ वर गेला. एकाच वेळी सगळ्या मुलींचे बारसे करण्यात आलं. त्यामुळे ३०६ बालिकांना एकावेळी आपल्या नावाच्या रुपाने आपली ओळख मिळाली. बारसे झाल्यानंतर आयोजकांनी या बालिकांना पाळणा, कपडे, वाळे भेट दिले. तर मुलीच्या आईंला फेटा बांधून साडीचोळी देण्यात आली.
स्त्री भ्रूण हत्यमूळे बीड जिल्ह्यात मुलीचा जन्मदर घसरला होता. हा दर १ हजार मुलांमागे ७०० इतका होता. मात्र त्यानंतर सरकारी यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. याचा परिणाम म्हणजे आता जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९२७ इतका मुलींचा जन्मदर आहे. त्यामुळे मागच्या काही काळात परिस्थिती सुधारली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा स्वरूपाचे उपक्रम राबवत मुलीच्या जन्माच्या स्वागताला प्रोत्साहान देणे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे.