आजकल प्रत्येक शिकलेला तरुण कामानिमित्त अमेरिकेत जाण्याचे स्वप्न पाहत असतो. मात्र, त्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबणे आवश्यक आहे अन्यथा त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. कारण, अशाच प्रकारे एका ३२ वर्षीय तरुणाने अमेरिकेला जाण्यासाठी असा काही मार्ग अवलंबला की ते ऐकूण तुम्हीही चक्राऊन जाल!

अहमदाबाद येथे राहणाऱ्या जयेश पटेल या ३२ वर्षीय तरुणाने अमेरिकेला जाण्यासाठी एका ८१ वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा पासपोर्ट चोरला आणि पासपोर्टवरील त्या वक्तीच्या फोटोप्रमाणे वेश बदलून तो अमेरिकेला जाण्यासाठी दिल्लीच्या विमानतळावर दाखल झाला. मात्र, येथे तपासणीसाठी तैनात असणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांच्या चाणाक्ष नजरेतून तो सुटू शकला नाही आणि सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतले.

८१ वर्षीय म्हाताऱ्या व्यक्तीचा वेश करताना जयेशने आपल्या केसांना आणि दाढी-मिशांना सफेद रंग लावून घेतला होता. विशेष बाब म्हणजे त्याने इमिग्रेशनच्या डोळ्यात धूळ फेकत क्लिअरन्स देखील मिळवला होता. ८ सप्टेंबर २०१९ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टी-३ च्या सुरक्षा भागात फ्रिस्किंगच्या वेळी ही घटना घडली. यावेळी अमरिक सिंह नावाचा एक प्रवाशी AI-101 या इंडिअन एअरलाइन्सच्या विमानाकडे जाण्यासाठी व्हिलचेअरवर बसला. त्यानंतर सुरक्षा तपासणीसाठी स्कॅनरवर तैनात असलेले सीआयएसएफचे अधिकाऱी सब इन्स्पेक्टर राजवीर सिंह यांनी त्याला तपासणीसाठी पोडिअमवर उभे राहण्यास सांगितले. मात्र, या अमरिक सिंह नामक व्यक्तीने आपले वय झाले असल्याने उभे राहू शकत नसल्याचे या अधिकाऱ्याला सांगितले. त्यानंतर राजवीर सिंह यांनी या व्यक्तीशी अधिक बोलण्याचा प्रयत्न केला मात्र, तो बोलताना डोळे लपवत होता.

त्याच्या या कृतीमुळे संशय आल्याने सीआयएसएफच्या अधिकाऱ्याने त्याचा पासपोर्ट तपासला त्यावेळी त्यावर अमरिक सिंह नाव लिहिले होते, १.२.१९३८ (८१ वर्षे) अशी जन्मतारिख होती. दरम्यान, या प्रवाशाची त्वचा आणि चेहऱा हा पासपोर्टमधील व्यक्तीच्या चेहऱ्यापेक्षा खूपच कमी वयाचा वाटत होता. त्यामुळे संशय आल्याने सीआयएसएफने कडक तपासणी केल्यानंतर अखेर त्याचा भांडाफोड झाला. या तपासात उघड झाले की जयेशने आपल्या केसांना आणि दाढी-मिशांना सफेद रंग लावून घेतला होता. आपले वय लपवण्यासाठी त्याने झिरो क्रमांकाचा चष्मा देखील लावला होता. त्यानंतर या प्रवाशाने आपली खरी ओळख सुरक्षा रक्षकांना सांगितली आणि असे करण्यामागचे कारणही स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी जयेशला दिल्ली पोलिसांच्या स्वाधीन केले तिथे त्याला औपचारिकरित्या अटक करण्यात आली.