Mangaluru Lecturer Dies after Donate Liver: बंगळुरूमध्ये एका ३३ वर्षीय महिलेचा यकृत दान केल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तात म्हटले की, अर्चना कामत नावाच्या महिलेने पतीच्या मावशीला आपल्या यकृताचा काही भाग दान केला होता. मात्र या शस्त्रक्रियेनंतर काही समस्या उद्भवल्यामुळे काही दिवसांतच तिचा मृत्यू झाला. दुसऱ्या व्यक्तीचा जीव वाचविण्यासाठी शरीराचा अवयव दान करण्याची उदार भूमिका घेतल्यानंतर दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे. तर अनेकांनी या घटनेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. या ३३ वर्षीय महिलेला चार वर्षांचा मुलगा आहे.

शस्त्रक्रियेनंतर काय झाले?

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, अर्चना कामतवर ४ सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. यकृताचा भाग दान केल्यानंतर पुढचे सात दिवस ती रुग्णालयातच होती. त्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. मात्र घरी गेल्यानंतर अर्चनाची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला पुन्हा एकदा रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे तिला संसर्ग झाला, ज्यामुळे अर्चना कामत यांचा मृत्यू ओढवला.

हे वाचा >> Govandi honour-killing case: हिंदू मुलाशी मुस्लीम मुलीने लग्न केल्यामुळे दोघांचे ऑनर किलिंग; चार अल्पवयीन आरोपींवर प्रौढ म्हणून खटला चालणार

कोण होत्या अर्चना कामत?

अर्चना कामत यांना चार वर्षांचा मुलगा आहे. त्यांचा पती सनदी लेखापाल असून त्या स्वतः शिक्षिका होत्या. अर्चनाच्या पतीची मावशी अनेक वर्षांपासून आजारी असून त्या १८ महिने यकृत दान करणाऱ्या व्यक्तीच्या शोधात होत्या. त्यामुळे अर्चनाने पुढाकार घेऊन त्यांना यकृताचा भाग दान करण्याचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या सेवांजली चॅरिटेबल ट्रस्ट रुग्णालयात अर्चना कामत यांनी अखेरचा श्वास घेतला.

सोशल मीडियावर काय प्रतिक्रिया उमटल्या?

सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अनेकांनी अर्चना यांच्या निस्वार्थी वृत्तीचे कौतुक केले आहे. तर काहींनी तिचा निर्णय अयोग्य असल्याचे म्हटले. ३३ वर्षीय महिलेने, चार वर्षांचा मुलगा असताना अवयव दान करण्याचा निर्णय घेणे चुकीचे आहे.

हे ही वाचा >> Pension : धक्कादायक! पेन्शन मिळविण्यासाठी ८० वर्षीय महिलेला दोन किमी रांगत जावं लागलं

एक्सवर शिव मुदगिल हीने लिहिले की, अर्चनाच्या निस्वार्थी वृत्तीला सलामच आहे. पण कोणतीही शस्त्रक्रिया धोक्याशिवाय होत नाही. तिचा पती कदाचित दुसरे लग्न करू शकेन. पण चिमुकल्या मुलाला त्याची आई मिळणार नाही.

शिव मुदगिल या युजरप्रमाणेच डार्क नाईट या हँडलवरूनही अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. “ती फक्त ३३ वर्षांची होती. तिला चार वर्षांचा मुलगा आहे. तिचा नवरा दुसऱ्या महिलेशी लग्न करू शकतो, पण आता तिच्या मुलाचे काय? त्याने तर आई गमावली ना. एक ३३ वर्षीय महिला ६५ वर्षीय रुग्णाला आपले ६० टक्के यकृत दान करते, कोण असे करते का? तिचा पती आणि त्याचे कुटुंबिय या प्रकरणात दोषी आहेत.”

Story img Loader