परीक्षेतील खराब निकालामुळे करिअर बरबाद होईल, करिअरचे सर्व दरवाजे बंद होतील, असा अनेकांचा समज असतो, पण तसे नाही. याचे जिवंत उदाहरण आहेत, गुजरातच्या भरूच जिल्ह्याचे कलेक्टर तुषार सुमेरा. त्यांना दहावीत फक्त पासिंग मार्क्स मिळाले होते, पण मेहनत आणि जिद्दीने ते आज कलेक्टर होण्यात यशस्वी झाले आहेत.
छत्तीसगड केडरचे आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विट करून सांगितले की, भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांना दहावीत फक्त पासिंग गुण मिळाले आहेत. तुषार सुमेरा यांना दहावीत असताना इंग्रजीत ३५, गणितात ३६ आणि विज्ञानात ३८ गुण मिळाले होते. तुषार सुमेरा यांचा निकाल पाहून संपूर्ण गावात, ते काहीच करू शकत नाही असे बोलले जात होते. पण तुषार यांनी मेहनत करून आणि स्वतःला झोकून देऊन असं स्थान मिळवलं की निंदा करणाऱ्यांची बोलतीच बंद झाली.
आयएएस अवनीश शरण यांच्या या ट्विटवर भरुचचे जिल्हाधिकारी तुषार सुमेरा यांनी ‘धन्यवाद सर’ लिहून त्यांना उत्तर दिले आहे. त्याच वेळी, या पोस्टवर आपला अभिप्राय शेअर करताना, अनेक युजर्सनी लिहिले आहे की “पदवी नाही, प्रतिभा महत्त्वाची आहे.” त्याच वेळी, कोणीतरी लिहिले – “आपले मार्क, ग्रेड किंवा रँक आपली क्षमता ठरवत नाही.”
‘मुंबईकर + सुरक्षा = आनंदी जीवन!’; मुंबई पोलिसांचा हटके रील तुम्ही पाहिला का?
तुषार सुमेरा हे सध्या भरूच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी आहेत. २०१२ मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून ते आयएएस अधिकारी बनले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरुचमध्ये उत्कर्ष पहल मोहिमेअंतर्गत केलेल्या कामांबाबत तुषार सुमेरा यांचा ट्विटरवर उल्लेख केला आहे. हायस्कूलमध्ये केवळ पासिंग गुणांसह उत्तीर्ण झालेल्या तुषार यांनी इंटरमिजिएटचे शिक्षण कला शाखेतून केले.
त्यानंतर बीएड केल्यानंतर त्यांना शिक्षकाची नोकरी मिळाली आणि याच नोकरीदरम्यान त्यांनी कलेक्टर होण्यासाठी यूपीएससी परीक्षेची तयारी केली आणि यश मिळवले. तुषार सुमेर यांची ही कथा अशा लोकांसाठी प्रेरणादायी आहे जे कमी गुण मिळाल्यामुळे हार मानतात.