‘या पैशातून तुला खाऊ घे’, किंवा ‘या पैशातून तुझ्या आवडते खेळणे घे’ असे सांगत अनेक लहान मुलांना त्यांचे बाबा किंवा आई वडिल, नातेवाईक मंडळी पैसे देतात. काहींनी आपल्या मुलांना पैसे बचतीची देखील चांगली सवय लावली आहे. अनेक लहान मुले रोज थोडे थोडे पैसे आपल्या पिग्गी बँकमध्ये साठवून ठेवतात. गल्ला भरला की त्यातून चॉकलेट्स, खाऊ, खेळणी कपडे यांची खरेदी करायाची असे भावविश्व मुलं रंगवत जातात. लहान वयात मुलांचे याच गोष्टीला प्राधान्य असते पण एका पाच वर्षांच्या मुलाने या कोणत्याच गोष्टींची खरेदी न करता साठलेल्या पैशातून पोलिसांसाठी जेवण खरेदी करून नवा आदर्श घालून दिला आहे.
विल्यम असे या मुलाचे नाव असून तो न्यू जर्सीमध्ये राहतो. आपण साठवलेल्या पैशाचे काय करता येईल याचा विचार तो कित्येक दिवसांपासून करत होता त्यावेळी न्यू जर्सीतल्या विनस्लो टाऊनशिप पोलिसांसाठी एक वेळचे पोटभर आणि चांगले जेवण खरेदी करण्याची कल्पना त्याच्या मनात आली. आपल्या आईजवळ त्याने ती बोलून दाखवली. त्यानंतर या पोलीस स्टेशनशी ईमेलद्वारे संपर्क साधून त्याच्या आईने आपल्या मुलाची इच्छा पोलिसांना सांगितली. पोलीसांनीही या ईमेलला उत्तर दिले. त्यानंतर छोट्या विल्यमने आईसोबत पोलिसांठी जेवण खरेदी केले. पोलीस मला नेहमी सुरक्षित ठेवतात, त्यांच्यामुळे मी रात्री सुखाची झोप घेऊ शकतो म्हणून त्यांचे आभार मानण्यासाठी मी जेवत विकत घेतले असल्याची प्रतिक्रिया या मुलाने दिली आहे. विनस्लो टाऊनशिप पोलीसांनी मुलांचे कौतुक करणारी एक पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवर टाकली आहे. यानंतर सगळ्यांनीच या मुलाच्या दिलदारपणाचे कौतुक केले आहे.