Kaun Banega Crorepati: अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध शो ‘केबीसी’ मध्ये ५० लाख रुपये जिंकणाऱ्या मध्य प्रदेश महसूल विभागातील एका महिलेने शुक्रवारी तहसीलदार पदाचा राजीनामा दिला होता. परंतु दुसऱ्याच दिवशी अचानकपणे आपला राजीनामा मागे घेतला. तहसीलदार अमिता सिंह तोमर या श्योपूर येथे तैनात आहेत. साधारण १० वर्षांपूर्वी अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये स्पर्धक म्हणून त्यांनी ५० लाख रुपये जिंकले होते पण त्यांची एवढीच ओळख नाही. तोमर या वेगवेगळ्या कारणांनी आजवर अनेकदा चर्चेत आल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडेच, श्योपूरच्या नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांनी सरकारी अधिकाऱ्यांमध्ये कामाची विभागणी केली. पण विभाजन बघून अमिता नाराज झाल्या. महत्त्वाच्या कामांमधून मुद्दाम डावलले गेले व त्यांच्या अनुभवाकडे दुर्लक्ष केले जात आहे अशी त्यांची तक्रार होती. याच पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला होता.

“गेल्या पाच वर्षांपासून माझा अपमान केला जात आहे. नवीन जिल्हाधिकारी नियुक्त झाल्यावर मला तहसीलचा कार्यभार सोपवला जाईल, असे वाटले होते, पण तसे झाले नाही. यामुळे मला मानसिक धक्का बसला आहे,” असे त्यांनी राजीनामा पत्रात लिहिले आहे. .

अमिता तोमर यांनी गेल्या पाच वर्षांत विविध खात्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा पदभार सांभाळला आहे. सध्या, त्या जमिनीच्या नोंदी पाहणाऱ्या मुख्य अधिकारी पदावर आहेत. शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये तहसीलदारांची नियुक्ती केल्यानंतर त्यांनी नाराजी दर्शवत सहायक जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द केला होता.

राजीनामा दिल्यावर त्यांनी आपली “मानसिक स्थिती ठीक नाही” असे सांगत माध्यमांना टाळले. मात्र, लगेच दुसर्‍या दिवशी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना राजीनामा स्वीकारू नये, असा अर्ज सादर केल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले.

श्योपूरचे जिल्हाधिकारी संजय कुमार यांनी इंडिया टुडेला सांगितले की, “तहसीलदार अमिता सिंह या वरिष्ठ तहसीलदार आहेत आणि त्यांनी येथे चार वर्षे पूर्ण केली आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार त्यांची बदली होणार होती. त्यामुळेच त्यांना नवीन जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र, वरिष्ठ तहसीलदार असल्याने अशी कारवाई योग्य नाही. याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात येईल.

हे ही वाचा<< रील बनवा, १० लाख कमवा; जितेंद्र आव्हाडांकडून स्पर्धेची घोषणा, म्हणाले, “मणिपूर, महाराष्ट्र ..”

यापूर्वी सुद्धा अमिता तोमर यांना २०१९ मध्ये, फेसबुकवर ‘आक्षेपार्ह’ कमेंट केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. त्यांनी पोस्टमध्ये धार्मिक विषयात अपशब्द वापरल्याचा आरोप होता. तर २०१७ मध्ये त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तिच्या “वारंवार बदल्या” केल्या जात असल्याचा दावा केला होता. यानंतर आता त्यांचे हे राजीनामा नाट्य सुद्धा चर्चेत आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 50 lakh rupees winner kbc star government officer amita resigns starts new fight blaming injustice and ignorance goes viral svs