Bodybuilding Fitness Workout Viral Video : पीळदार शरीरयष्टी बनवण्यासाठी व्यायामशाळेत जाऊन घाम गाळावा लागतो. शरीरसौष्ठव स्पर्धेत भाग घेणारे बॉडी बिल्डर्स व्यायामशाळेत कंबर कसून सकस आहार फॉलो करत असतात. पण केरळच्या एका रिक्षा चालकाने कमालच केली आहे. वयाच्या ५३ व्या वर्षीही जबरदस्त शरीरयष्टी करून अनेकांना फिटनेसचा गुरुमंत्रच दिल्याचं एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. केरळमधील फिटनेस इन्फ्लूएन्सर राजा सेखरन यांनी त्यांच्या फिटनेस वर्कआऊटचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. घरातच व्यायाम करून पीळदार शरीरयष्टी कशी बनवता येते? या प्रश्नाचं उत्तर हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तु्म्हाला नक्कीच मिळेल.
रिक्षा चालकाने शेअर केला फिटनेसचा गुरुमंत्र, पाहा व्हिडीओ
राजा यांच्या इन्स्टाग्राम पेजला १७ हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. रिक्षा चालक आणि बॉडी बिल्डर राजा यांनी उत्तम शरीरयष्ठी बनवण्यासाठी घरातच कशाप्रकारे चांगला व्यायाम करता येईल, याचं प्रशिक्षणच या व्हिडीओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची रोजच्या दैनंदिन वर्क आऊटचं नियोजन कसं आहे, हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. फॅन्सी साहित्य, तसेच ड्राय-फिट कपडे नसतानाही राजा यांनी त्यांचा शरीराला जबरदस्त व्यायाम करुन सुबक आखणी दिली आहे. राजा यांचा फिटनेस पाहून तरुणी पिढीला नक्कीच प्रेरणा मिळेल, कारण या व्हिडीओत व्यायाम करण्याची चांगली पद्धत दाखवण्यात आलीय.
इथे पाहा व्हिडीओ
राजा यांनी फिटनेस वर्क आऊट शेअर करतानाच त्यांच्या डाएट प्लॅनबद्दलही माहिती दिलीय. सकस आघार कसा घ्यायचा, याबद्दल त्यांनी माहिती दिलीय. अतिशय स्ट्रिक्ट डाएट करत असल्याचं त्यांनी या पोस्टच्य माध्यमातून सांगितलं आहे. साखरेचे पदार्थांचं सेवन न करणे, प्रथिनयुक्त पदार्थ खाणे, शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या तेलाचा खाद्यपदार्थांमध्ये वापर करणे आणि आरोग्यासाठी पोषक असणारेच खाद्यपदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला त्यांनी लोकांना दिला आहे.
व्यायाम करणे, योगा करणे, रोज ६ किमी चालणे, अशाप्रकारचे फिटनेसचे काही नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी या पोस्टच्या माध्यमातून केलं आहे. पोस्ट शेअर करताना शेखरन यांनी म्हटलं,” वयाच्या ४७ व्या वर्षी व्यायामाचं गांभीर्य लक्षात आलं. तेव्हापासून व्यायाम करायला सुरुवात केली. चांगला वर्क आऊट करण्यासाठी व्यायाम करण्याबाबत अभ्यास केला. कधी कधी मित्रांकडूनही व्यायाम करण्याबाबत सल्ले घेतले. सकाळी ४ वाजता व्यायाम करायला सुरुवात करतो.”