देशाच्या सीमेवर तैनात भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (ITBP) जवान सुरक्षेसाठी रात्रंदिवस दक्ष असतात. शत्रूंना सीमेवर रोखण्यासाठी जीवाची बाजी लावून पहारा देत असतात. धैर्य आणि उत्साहाने देशवासियांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. अशा वातावरणातही काही जवानांची कामगिरी पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयटीबीपीचे ५५ वर्षीय कमांडंट रतन सिंग सोनल यांच्या कामगिरीचं तुम्हीही कौतुक कराल. त्यांनी उणे ३० डिग्री सेल्सियस तापमानात ६५ पुशअप्स मारले. त्यांच्या कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सामान्यपणे अशा वातावरणात आपल्यासारख्यांना उभं राहणं देखील कठीण आहे.
भारतीय सीमा सुरक्षा दलाचे (ITBP) ५५ वर्षीय कमांडंट रतन सिंग सोनल यांनी लडाखमध्ये सुमारे १७,५०० फूट उंचीवर आणि उणे ३० अंश सेल्सिअस तापमानात ६५ पुशअप्स यशस्वीपणे पूर्ण करत विक्रम केला आहे. त्यांचा पुशअप्स मारतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कमांडंट रतन सिंग सोनल, मूळचे उत्तराखंडच्या कुमाऊ खोऱ्यातील पिथौरागढचे रहिवासी आहेत. ते १९८८ च्या बॅचमध्ये आयटीबीपीमध्ये उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. त्यांनी आपल्या सेवेत अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.
यापूर्वी, रतन सिंग सोनलने जगातील आठव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर माऊंट मनास्लू जिंकून जगात एक नवा विक्रम केला आहे. आयटीबीपी कमांडंट रतन सिंग सोनल आणि डेप्युटी कमांडंट अनूप कुमार यांनी २५ सप्टेंबर २०२१ रोजी या शिखरावर यशस्वी चढाई केली होती. या शिखराची उंची समुद्रसपाटीपासून ८,१६३ मीटर (२६७८१ फूट) आहे. ही गिर्यारोहण मोहीम ७ सप्टेंबर २०१२ रोजी सुरू झाली होती.
आयटीबीपीची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली आहे. आयटीबीपीचे जवान प्रामुख्याने लडाखमधील काराकोरम पास ते अरुणाचल प्रदेशातील जाचेप ला पर्यंत ३,४८८ किमी लांबीच्या भारत-चीन सीमेच्या रक्षणासाठी तैनात आहेत. याशिवाय छत्तीसगडमधील अनेक अंतर्गत सुरक्षा कामांमध्ये आणि नक्षलग्रस्त भागातही हे दल महत्त्वाची भूमिका बजावत आहे. सैन्याच्या बहुतेक सीमा चौक्या ९,००० फूट ते १८,००० फूट उंचीवर आहेत. तिथे तापमान उणे ४५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते.