गुजरातमधील सुरत शहरामध्ये पोलिसांना खोट्या नोटांचा मोठा साठा सापडला आहे. कामरेज पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी खबऱ्यांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. या चलनी नोटांचे मूल्य २५ कोटी ८० लाख रुपये इतकं आहे. विशेष म्हणजे या नोटा चलनी असल्याचं एका छोट्याश्या चुकीमुळे पोलिसांच्या लक्षात आलं आहे ही कारवाई करण्यात आली.
गुजरात पोलीस दलातील ग्रामीण विभागाचे अधिक्षक हितेश जोसर यांनी या कारवाईसंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. मुंबई-अहमदाबाद मार्गावरुन मोठ्या प्रमाणात चलनी नोटा नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या मार्गावरुन जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला चेकपोस्टवर अडवलं आणि तपासणी केली असता त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. या रुग्णवाहिकेमध्ये चलनी नोटांच्या सहा मोठ्या पेट्या पोलिसांना आढळून आल्या.
रुग्णवाहिकेच्या मागील बाजूस ठेवलेल्या सहा कंटेनरमध्ये १ हजार २९० पाकिटांमध्ये दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा पोलिसांना सापडल्या. या नोटांचे चलनी मूल्य हे २५ कोटी ८० लाख इतकं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या नोटांवर रिझर्व्ह बँक असं लिहिण्याऐवजी रिव्हर्स बँक असं छापण्यात आलं आहे. या नोटा जवळून पाहिल्यानंतर हा महत्त्वाचा फरक दिसून येतो असं पोलिसांनी सांगितलं. बँकेचे अधिकारी आणि फॉरेन्सिक टीमला या नोटांची तपासणी करण्यासाठी पाचारण करण्यात आलं. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.
या नोटांवर ‘मुव्ही शुटींग पर्पज’ असंही लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे या नोटा चित्रिकरणासाठी नेमक्या कोणी छापल्या? यासंदर्भातील परवानगी घेण्यात आली होती का? या नोटा कोणाकडून छापून कुठे पाठवण्यात येत होत्या? त्यांचा वापर नेमका कुठे केला जाणार होता? यासारख्या प्रश्नांचा सध्या शोध घेतला जात आहे.