उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. अशातच जम्मू काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी तापमान हे उणे ३ अंश सेल्शिअसच्या आसपास पोहचले आहे. बर्फवृष्टीने अनेक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अशावेळी शिमलामधील काही पोलीस २३ वर्षीय गर्भवती महिलेच्या मदतीसाठी देवासारखे धावून आले. रस्ते बंद असल्याने या महिलेला रुग्णालयात पोहचण्यास अडथळे येत होते. तेव्हा शिमलामधल्या ६ पोलीस कर्मचा-यांनी या महिलेला खांद्यावर वाहून नेत तब्बल तीन तास बर्फातून प्रवास केला आणि तिला वेळेवर रुग्णालयात पोहोचवले.

वाचा : भारतातल्या १% गर्भश्रीमंतांकडे देशातली ५८% संपत्ती..

शिमलामधल्या भोंट गावातील २३ वर्षीय कामिनी हिला प्रसुती कळा सुरू झाल्या. पण गेल्या काही दिवसांपासून या भागात जोरदार बर्फवृष्टी होत आहे. तर या गावात ४ फूट बर्फांचे थरही साचले आहे. बर्फवृष्टीमुळे येथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्यामुळे रस्ते देखील बंद करण्यात आले आहेत. अशा वेळी या महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. रुग्णालयाकडे जाणारे रस्ते बंद होते आणि रुग्णालय गावापासून दहा किलोमीटर दूर होते. रस्ते बंद असल्याने रुग्णवाहिकेची सोय होत नव्हती. अशावेळी शिमला पोलीस दलातील सहा पोलीस देवासारखे या गर्भवती महिलेच्या मदतीसाठी धावून आले. तिला खांद्यावर वाहून नेत त्यांनी तिला सुखरूप रुग्णालयात पोहोचवले. तीन तास तिला खांद्यावर वाहून नेत त्यांनी तिला कमला नेहरु रुग्णालयात दाखल केले. या महिलेने मुलीला जन्म दिला.

वाचा : परिसर स्वच्छ राखणाऱ्या प्रवाशांसाठी ‘या’ रिक्षावाल्याने देऊ केली मोफत सेवा

Story img Loader