Pakistani girl pull shot Viral Video : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पाकिस्तानच्या एका ६ वर्षीय मुलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. क्रिकेटच्या चाहत्यांना हा व्हिडीओ विशेषकरून आवडताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये ही चिमुरडी क्रिकेट खेळत असून तिच्या पुल शॉटचे अनेकजण कौतुक करताना दिसत आहेत.
या मुलीचे नाव सोनिया खान असे असून तिचा पुल शॉट पाहून क्रिकेटबद्दल थोडीफार समज असलेले लोक तिच्या या शॉटची तुलना भारतीय क्रिकेट स्टार रोहित शर्मा याच्या परफेक्ट पुल शॉटशी करत आहेत.
इंग्लंडचे अंपायर रिचर्ज केटलबोरो (Richard Kettleborough) यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक गोलंदाज सोनिया खान हिला गोलंदाजी करताना दिसत आहे आणि ती एकदम अचूक पद्धतीने पुल शॉट खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडीयावर वेगाने शेअर केला जात आहे आणि या चिमुरडीचे सर्वजण कौतूक करत आहेत. इतक्या कमी वयात तिने मिळवलेल्या कौशल्याचं तोंडभरून कौतुक केलं जात आहे.
“६ वर्षांची – पाकिस्तानची प्रतिभावान सोनिया खान (रोहित शर्मासारखा पुल शॉट खेळते),” असं कॅप्शन केटलबोरो यांनी त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओला दिले आहे.
6 yrs old ~ Talented Sonia Khan from Pakistan ?? (Plays Pull Shot like Rohit Sharma) ?? pic.twitter.com/Eu7WSOZh19
— Richard Kettleborough (@RichKettle07) March 19, 2025
या व्हिडीओला जवळपास १० लाख व्ह्यूज मिळाले असून यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना सोनियाला पाकिस्तान महिला क्रिकेट संघात स्थान मिळालं पाहिजे अशी आशा व्यक्त केली आहे. इतके नाही तर काही वापरकर्त्यांनी तर तिला बाबार आझम आणि मोहम्मद रिझवान हिच्या जागी खेळवले पाहिजे असेही सुचवले आहे.
“सध्याचा पाकिस्तान संघ न्यूझीलंडमध्ये ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यामुळे हा मुलगी त्यांच्या पुरुष संघातही स्थान मिळवू शकते. हे सोडून, या सुंदर प्रतिभेला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा,” असे एका वापरकर्त्याने लिहिले.
शुभेच्छा. आशा करतो की एके दिवशी तू पाकिस्तान महिला क्रिकेट संघात खेळशील. भारतातून प्रेम,” अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका वापरकर्त्याने दिली आहे. “रिझवान आणि बाबर या दोघांपेक्षा उत्तम. ती पाकिस्तान पुरूष संघात असायला हवी,” असं तिसर्या एका वापरकर्त्याने म्हटले आहे.