तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा लहान मुलांचे असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील किंवा त्यांना असं काही बोलताना ऐकलं असेल ज्याने तुम्ही भावूक झाला असाल. पण यावेळी आपण ज्या चिमुरड्याबद्दल बोलत आहोत त्याचे बोलणे ऐकून तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल.. होय! आम्ही एका ६ वर्षाच्या लहान मुलाबद्दल बोलत आहोत, ज्याला कॅन्सर आहे. जेव्हा त्याला स्वतःला कॅन्सर झाल्याचे समजले तेव्हा ही गोष्ट माझ्या पालकांना सांगू नका असे त्याने डॉक्टरांना सांगितले. डॉक्टरही हे ऐकून भावनिक झाले. डॉक्टरांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना ही माहिती दिली आहे.
चिमुरड्याने डॉक्टरांना ‘हे’ सांगितले…
या लहान चिमुरड्यासोबत साधलेला संवाद डॉक्टरांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. जी गोष्ट खरं तर या लहान मुलाला समजायला नको होती, नेमकी तीच समजली. चिमुरड्याला कॅन्सर असल्याचे समजताच तो डॉक्टरांना म्हणाला, “डॉक्टर मला ग्रेड 4 चा कॅन्सर आहे, मी आयपॅडवर या आजाराबद्दल सर्व काही वाचले आहे की, मी फक्त सहा महिनेच जगू शकतो, फक्त माझ्या आईबाबांना याबद्दल सांगू नका”. अवघ्या ६ महिन्याच्या मुलाचे हे बोलणे ऐकल्यावर डॉक्टरही थक्क झाले.
…असे पालकांनी डॉक्टरांना सांगितले
मात्र, दुसरीकडे या लहान मुलाचे पालक डॉक्टरांना भेटल्यावर त्यांनी देखील डॉक्टरांना विनंती केली. यावेळी ते म्हणाले “डॉक्टर तुम्ही माझ्या मुलाला भेटा आणि तुमच्या उपचारांनी तो बरा होईल असं त्याला सांगा, पण कृपया त्याला त्याच्या या आजाराविषयी सांगू नका” यानंतर डॉक्टरांनी पालकांना त्यांचा लहान मुलासोबत झालेल्या संवादा बद्दल सांगितले.
( हे ही वाचा: वाघीणीने बछड्यासह शाही थाटात ओलांडला रस्ता; पर्यटकांची गर्दी मात्र… ताडोबा उद्यानातील ‘हा’ क्षण होतोय Viral)
९ महिन्यांनी पालक भेटायला पुन्हा आले..
९ महिन्यानंतर पालक डॉक्टरांना पुन्हा भेटायला आले. यावेळी त्यांनी डॉक्टरांचे आभार मानले. ते म्हणाले” डॉक्टर आम्ही इथून गेल्यानंतर आमच्या मुलासोबत चांगला वेळ घालवला. त्याला डिजीलँडला जायचे होते तिथे त्याला आम्ही घेऊन गेलो. महिन्याभरापूर्वी आम्ही आमच्या मुलाला गमावले. तुम्ही दिलेल्या धीर आणि सल्ल्यामुळेच आम्हाला आमच्या मुलासोबतचे ८ महिने चांगले घालवता आले. डॉक्टरांनी या चिमुरड्याची सांगितलेली गोष्ट खरंच खूप भावूक आहे. ही घटना वाचून नेटकरी देखील भावूक प्रतिक्रिया देत आहेत.