60 Worms Removed From Women’s Eyes: चीनच्या कुनमिंगमधून समोर येणाऱ्या एका धक्कादायक घटनेमध्ये डॉक्टरांनी एका महिलेच्या डोळ्यातून तब्बल ६० जिवंत जंत बाहेर काढल्याचे समजतेय. महिलेने तिच्या डोळ्यांना खाज सुटल्यानंतर हॉस्पिटल गाठले, जिथे तिला कळले की तिला जंत संसर्ग झाला आहे. काही वेळाने तर आधीच हादरून गेलेल्या महिलेच्या पापण्या आणि डोळ्यांच्या बुबुळांमधील जागेत जंत रेंगाळत असल्याचे आढळून आले. हेल्थकेअर मधील डॉक्टर्स व तज्ज्ञ सुद्धा असामान्य प्रकरण पाहून थक्क झाले. होते.
या महिलेवर तातडीने उपचार करून मग हॉस्पिटलमध्ये तिच्या डोळ्यातील जंत काढण्याची प्रक्रिया पार पाडली. डॉ. गुआन, यांनी प्रसारमाध्यमांना तिच्या डोळ्यात साठ जंत असल्याची माहिती दिली, ही एक दुर्मिळ घटना असल्याचे सुद्धा डॉक्टर सांगतात. राउंडवर्म्सची लागण झाल्याने या महिलेच्या डोळ्यात खाज सुटली होती. डॉक्टरांच्या अंदाजानुसार, तिला तिच्या आसपासच्या प्राण्यांपासून संसर्ग झाला असावा. या आधारावर, डॉक्टरांनी तिला चांगली स्वच्छता राखण्यास सांगितले, विशेषत: पाळीव प्राण्यांशी संवाद साधल्यानंतर हात- पाय, चेहरा स्वच्छ धुणे अत्यावश्यक आहे हे ही डॉक्टरांनी यावेळी अधोरेखित केले.
दरम्यान अशाच प्रकारे २०२० मध्ये नोंदवलेल्या एका घटनेत, एका ६० वर्षीय चिनी महिलेच्या पापणीमध्ये तब्बल २० जंत आढळून आले होते जे शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले होते. तर अशा एका अन्य प्रकरणात अर्भकाला या प्रकारची जंत लागण झाल्याचे असल्याचे आढळून आले होते, त्याच्याही डोळ्यातून तब्बल ११ जंत बाहेर काढण्यात आले होते पण सध्या चर्चेत असणारे हे प्रकरण सर्वाधिक जंत संख्येमुळे आणखीनच भीतीदायक ठरत आहे.
हे ही वाचा<< झोपताना दोन बदाम ‘या’ गोष्टीसह एकत्र खाल्ल्याने नजर होईल तीक्ष्ण? डॉक्टरांनी सांगितले ५ महत्त्वाचे नियम
डोळ्यांची काळजी कशी घ्यावी?
- चेहरा धुताना डोळे सुद्धा काळजीपूर्वक धुवावे.
- इतर वस्तूंना हात लावला असल्यास तेच हात डोळ्याला लावू नये
- डोळे चुरचुरत असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही ड्रॉप डोळ्यात टाकू नयेत.
- काजळ किंवा लायनर निवडताना त्याची गुणवत्ता नक्की तपासून पाहावी.
- घरगुती काजळ वापरणे कधीही उत्तम
- डोळे चोळू नये,
- सूर्यप्रकाश किंवा धुळीच्या ठिकाणी गॉगल्स घालणे उत्तम