एखादी गोष्ट करण्यासाठी वयाचे बंधन नसते असं म्हणतात, याचा प्रत्यय आज एका व्हायरल व्हिडीओतून आला आहे. आयसीआयसीआय बँकेतर्फे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असतो. या दरम्यान ७३ वर्षांचे आजोबा आणि प्रसिद्ध गायक शान एक सुंदर गाणं सादर करताना दिसत आहेत. आजोबांचा या वयातील जोश आणि आवड पाहून सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रासुद्धा प्रभावित झाले आहेत.
७३ वर्षांचे आजोबा डॉक्टर सुरेश नांबियार कन्नूरचे रहिवासी आहेत. तसेच त्यांना गाणं म्हणण्याचीही आवड आहे. तर या कार्यक्रमानिमित्त ७३ वर्षीय आजोबांना गाणं सादर करण्याची संधी मिळाली आहे व त्यांनी या संधीचे सोनं केलं आहे. व्हिडीओची सुरुवात प्रसिद्ध गायक शान यांचे गाणं म्हणण्याने होते. त्यानंतर आजोबासुद्धा गाणं गाऊन त्यांचे कौशल्य दाखवताना दिसतात. एकदा पाहाच ही अनोखी जुगलबंदी.
हेही वाचा…अरे वाह! केकऐवजी फळ कापून केला वाढदिवस साजरा; पोलिस अधिकाऱ्यांच्या VIDEO ची सोशल मीडियावर चर्चा
व्हिडीओ नक्की बघा :
आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ बघितला आणि रिपोस्ट करीत लिहिले की, “ही स्पर्धा बऱ्याच महिन्यांपूर्वी घडली होती. पण, या व्हिडीओने आज माझे लक्ष वेधून घेतले. डॉक्टर सुरेश नांबियार यांचे गाणं ऐकण्यासाठी मी सभागृहात उपस्थित असतो तर मी उभं राहून, टाळ्या वाजवून त्यांच्या मनमोहक आवाजाचे कौतुक केले असते. पण, सर्वात जास्त प्रशंसा या गोष्टीची करावीशी वाटते की, त्यांनी या व्हिडीओतून दाखवले की, तुमच्या इच्छेनुसार जीवन जगा व त्यात कोणतीही कसर सोडू नका. धन्यवाद @ICICIBank ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, ज्यामध्ये आता माझासुद्धा समावेश आहे आणि धन्यवाद डॉक्टर नांबियार, आम्हाला आमच्या आवडीला ‘आवाज’ देण्याची आठवण करून दिल्याबद्दल; अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.
सोशल मीडियावर ही पोस्ट आनंद महिंद्रा यांच्या @anandmahindra या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी ७३ वर्षीय आजोबांचे विविध शब्दांत कमेंटमध्ये कौतुक करताना दिसून आले आहेत. एकूणच या व्हिडीओने सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.