Republic Day 2024: २६ जानेवारी २०२४ हा भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा क्षण असणार आहे. यंदा कोट्यावधी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा हिरक महोत्सवी सोहळा साजरा करणार आहेत. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना लागू झाल्याची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधान समितीने संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० पासून ते अंमलात आणले गेले. म्हणूनच २६ जानेवारी ही प्रजासत्ताक दिनाची तारीख म्हणून निवडण्यात आली. याच दिवशी तब्बल २० वर्षांपूर्वी म्हणजेच १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्यासाठी घोषणा सुद्धा केली होती. भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक असेलेल्या या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे पण तरीही दरवर्षी एक गोंधळ मात्र प्रत्येकाच्या डोक्यात असतो ती म्हणजे यंदा प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं कोणतं वर्ष आहे?
यंदाचा प्रजासत्ताक दिन ७५ वा की ७६ वा ?
भारताला १९४७ मध्ये वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले तर, २६ जानेवारी १९५० ला संविधान लागू झाले होते. प्रजासत्ताक दिन देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवाच्या अनेक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे राजपथ, दिल्ली येथे सुरू होऊन इंडिया गेटपर्यंत आयोजित केली जाणारी परेड. या दिवशी देशाचे राष्ट्रपती राजपथ, नवी दिल्ली येथे ध्वजारोहण करतात. सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त, भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दल यांच्या परेड आणि एअर शोद्वारे भारताचा सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा दर्शवला जातो.
यंदा ७५ वा प्रजासत्ताक दिन का, ७६ वा का नाही?
हे विरोधाभासी वाटू शकते, पण प्रजासत्ताक दिनाची गणना कॅलेंडर वर्षाच्या आधारावर केली जात नाही. उलट भारतीय संविधान स्वीकारल्यापासून किती वर्ष झाली यावर आधारित आहे. त्यानुसार ऐतिहासिक घटना २६ जानेवारी १९५० रोजी घडली व २०२४ म्हणजे यंदा प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन आहे.
हे ही वाचा<< ‘पायो जी मैंने राम रतन..’, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात मान मिळालेली धून असलेले गीत कुणाचे? त्याचा भावार्थ काय?
पहिली प्रजासत्ताक दिनाची परेड कधी पार पडली?
१९५० मध्ये इर्विन अॅम्फीथिएटर (आताचे मेजर ध्यानचंद स्टेडियम) येथे प्रजासत्ताक दिन परेड पहिल्यांदा सुरुवात झाली. तर राजपथ (आताचे कर्तव्यपथ) येथे पहिली परेड १९५५ मध्ये पार पडली. यावेळी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल मलिक गुलाम मुहम्मद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, भारताचे राष्ट्रपती राष्ट्राला संबोधित करतात, तर पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित करतात.