Viral News: तुम्ही आतापर्यंत लैला-मजनू, रोमिओ-ज्युलिएट यांच्या अजरामर प्रेमकथा ऐकल्या असतील. खरंच प्रेम ही एक गोड भावना आहे. जी व्यक्ती प्रेमात पडते, तेव्हा ती प्रेम करणाऱ्या व्यक्तीसाठी काहीही करायला तयार असते. प्रेमाचे असे अनेक किस्से आपण बऱ्याचदा ऐकले किंवा पाहिले असतील. पण, हल्ली समोर येणाऱ्या अनेक घटनांमध्ये कधी, कोण, कोणाच्या प्रेमात पडेल ते सांगता येत नाही. तसं पाहायला गेलं, तर प्रेम कधीही जात, धर्म, रंग, रूप, वय पाहून केलं जात नाही. पण, नुकत्याच समोर आलेल्या घटनेमध्ये एका ८० वर्षांच्या वृद्धानं आपल्या प्रेयसीबरोबर लग्न केल्याचं पाहायला मिळत आहे.

८० वर्षांच्या वृद्धानं केलं लग्न

प्रेम आणि लग्नाला वयाची मर्यादा नाही. ही गोष्ट राजस्थानातील वृद्धानं खरी करून दाखवली आहे. ८० वर्षांच्या रंगजी नामक वृद्धानं मागील ४० वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रेयसीबरोबर लग्न केलं आहे. त्याची ही प्रेयसी ७८ वर्षांची आहे. ही अनोखी प्रेमकथा अनेकांच्या भुवया उंचावत आहे.

खरं तर ही गोष्ट आहे १९८५ सालची, जेव्हा बांसवाडाच्या संगमेश्वर महादेव मंदिराच्या जत्रेमध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. ही भेट प्रेमात बदलली. वर्षांमागून वर्ष सरत गेली, तसतसे त्यांच्यातील प्रेमाचं नातं अधिकाधिक घट्ट होत गेलं. त्यामुळे जवळपास २० वर्षांपूर्वी रंगजी यांनी प्रेयसी रूपीला आपल्या घरी आणलं तेव्हा हे दोघेही लग्न न करता एकमेकांबरोबर राहत होते.

४० वर्षांनंतर केलं लग्न

समाजात दोघांच्या प्रेमाला पती-पत्नी म्हणून संमती मिळाली होती; परंतु त्यांनी लग्न केलं नव्हतं. मात्र, नुकतंच काही दिवसांपूर्वी दोघांनी एकमेकांबरोबर लग्न केलं. नातेवाईक आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत दोघांनी विधिवत लग्न केलं आणि सात फेरे घेतले. त्यांचा हा लग्नसोहळा पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

या दोघांमधील हे प्रेम अनेक जोडप्यांसाठी प्रेरणादायी आहे. एकमेकांवरील विश्वास, प्रेम व आदर यांच्यामुळे नातं शेवटपर्यंत कसं टिकू शकतं हे त्यांच्यातील प्रेमबंधामुळे शिकायला मिळत आहे.