८ जानेवारी हा दिवस म्हणजे महान विश्वशास्त्रज्ञ, लेखक आणि शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिन. स्टीफन हॉकिंग यांना त्यांच्या ८०व्या जन्मदिनी गुगल डुडलने अनोखी मानवंदना दिली आहे. या खास डुडलमध्ये एक व्हिडीओ आहे ज्यात स्टीफन हॉकिंग यांचा जीवनप्रवास तसेच त्यांच्या कार्याची एक झलकही दर्शवली गेली आहे. अडीच मिनिटाच्या या डुडल व्हिडिओमध्ये स्टीफन यांचा संगणकाने तयार केलेला आवाज वापरण्यात आला असून याचा वापर सर्व परवानग्या घेऊन करण्यात आल्याचं गूगल कडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे जन्म झालेल्या स्टीफन हॉकिंग यांना लहानपणापासूनच अवकाशाविषयी विशेष रुची होती. वयाच्या २१व्या वर्षी त्यांना न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजाराने ग्रासले. या आजारामुळे हळू हळू त्यांच्या हालचाली व्हीलचेअरपर्यंत मर्यादित झाल्या. या आजारामुळे त्यांनी आपली बोलण्याची क्षमताही गमावली. त्यानंतर त्यांनी स्पीच-जनरेटर उपकरणाच्या साहाय्याने संवाद साधण्यास सुरुवात केली. गुगलने त्यांचे ‘इतिहासातील सर्वात प्रभावशाली वैज्ञानिक बुद्धिजीवींपैकी एक’ असे वर्णन केले आहे.
‘या’ शहराचा असणार स्वतःचा चंद्र; रोबोट देणार सेवा, तर हवेत उडणार कार
स्टीफन विल्यम हॉकिंग यांनी कृष्णविवरांवर (ब्लॅक होल / Black Hole) केलेल्या कामामुळे केंब्रिजने त्यांना गणिताचे लुकेशियन प्राध्यापक बनवले. १६६९ साली आयझॅक न्यूटन यांनी या पोस्टची स्थापना केली होती. १९७४मध्ये स्टीफन यांनी शोधून काढले की ब्लॅक होलमधून कण बाहेर पडू शकतात. हॉकिंग रेडिएशन नावाचा हा सिद्धांत त्यांचे भौतिकशास्त्रातील सर्वात महत्त्वाचे योगदान मानले जाते.
स्टीफन हॉकिंग यांचे २०१८ साली वयाच्या ७६व्या वर्षी निधन झाले. २०१७ साली स्टीफन यांचा डॉक्टरेट प्रबंध केंब्रिज विद्यापीठाच्या वेबसाइटवर लोकांसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. परंतु प्रचंड ट्राफिकमुले तो क्रॅश झाला.
गुगलने अत्यंत रोचक पद्धतीने हा व्हिडीओ बनवला असून ब्रह्मांडाबाबत स्टीफन हॉकिंग यांचे योगदान यामध्ये दाखवण्यात आले आहे. तसेच या व्हिडीओमध्ये स्टीफन यांना न्यूरोडीजेनेरेटिव्ह आजारामुळे आयुष्यात जो संघर्ष करावा लागला याचेही वर्णन करण्यात आलंय. गुगलचा हा डूडल व्हिडिओ हॉकिंग यांच्या अंतराळ आणि विश्वविज्ञानातील योगदानाला समर्पित आहे. हे डूडल कलाकार मॅथ्यू क्रुईकशँक यांनी बनवले आहे.