देशात करोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. तर, ओमायक्रॉनची रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे. सध्या करोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. सरकारही लसीकरणावर भर देत असून गावोगावी तसेच घरोघरी लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन लोकांचे लसीकरण करत आहेत. लस आणि लसीकरणाच्या सर्व सोयी उपलब्ध असूनही लस न घेणारे लोक देखील आहेत. पण एका व्यक्तीने एक-दोन नव्हे तर तब्बल ११ वेळा लसीचे डोस घेतल्याचं समोर आलंय. , बिहारमधील एका ८४ वर्षीय व्यक्तीने लसीचे ११ डोस घेतल्याचा दावा केला आहे.
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील उदकिशुनगंज उपविभागांतर्गत पुरैनी पोलिस स्टेशनच्या ओराई गावातील रहिवासी ब्रह्मदेव मंडल यांना त्यांचा १२वा डोस घेण्यापूर्वीच पकडण्यात आले आहे. ब्रम्हदेव मंडल यांनी लसीचे इतके डोस कसे घेतले हे शोधण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे मधेपुरा जिल्ह्याच्या सिव्हिल सर्जनने सांगितले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, लस घेणारे मंडल म्हणाले की, “लसींचा त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होत असल्याने त्यांनी ११ डोस घेतले. मला लसीचा खूप फायदा झाला. म्हणूनच मी ते वारंवार घेत आहे.” मंडल टपाल विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. गेल्या वर्षी १३ फेब्रुवारी रोजी त्यांनी पहिला लसीचा डोस घेतला. त्यानंतर १३ फेब्रुवारी ते ३० डिसेंबर दरम्यान त्यांनी सार्वजनिक आरोग्य केंद्रात ११ डोस घेतले. त्यांनी लसीचे ठिकाण, तारीख आणि वेळ देखील लिहून दिली.
ऑफलाइन शिबिरांमध्ये लोक अशा प्रकारे फसवणूक करू शकतात, असा दावा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. ते म्हणाले की आधार कार्ड आणि फोन नंबर शिबिरांमध्ये गोळा केले जातात आणि नंतर डेटाबेसमध्ये दिले जातात. अनेकदा कंप्युटरवरील डेटा आणि ऑफलाइन रजिस्टरमधील डेटा वेगळा असतो. अशा वेळी माहितीची पुनरावृत्ती झाल्याचे आढळल्यास ते नाकारले जातात. परंतु ते अपलोड होण्यापूर्वी लसीकरण झालेलं असतं”, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.