दुबईमध्ये एका नऊ वर्षीय भारतीय वंशाच्या मुलीचे नशीब चांगलेच फळफळले आहे. या मुलीने तब्बल सात कोटी रुपयांची लॉटरी जिंकली आहे. या मुलीचे नाव ‘एलिजा’ असे आहे. या मुलीचे वडील मुळचे मुंबईकर असून गेली १९ वर्ष ते दुबईमध्ये राहत आहेत.
दुबईमध्ये ‘दुबई ड्यूटी फ्री मिलेनियम मिलियनेयर’ नामक लॉटरी गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. याच कंपनीचे एक तिकीट एलिजाच्या वडिलांनी तिच्या नावाने खरेदी केले होते. या तिकीटाचा क्रमांक ०३३३ असा होता. एलिजाचे वय नऊ वर्ष असून तिचा लकी नंबरही नऊच आहे त्यामुळे तिकीटातील क्रमांकांची बेरीज केली असता त्याचे उत्तर नऊ असे येते त्यामुळे त्यांनी या तिकीटाची खरेदी केल्याचे सांगितले.
लाखो लोकांनी आपले नशीब आजमवण्यासाठी लॉटरीचे तिकीट खरेदी केले होते. मात्र, लकी ड्रॉ प्रक्रिया जेव्हा करण्यात आली, तेव्हा ७ कोटींचे बक्षीस एलिजाच्या वाट्याला आले. एलिजाचे वडील तिला फार भाग्यशाली मानतात. त्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा एलिजा तीन वर्षांची होती तेव्हा याच लॉटरी सिस्टममध्ये त्यांनी एक लक्झरी कार जिंकली होती. एलिजाचे वडील हे मुंबईकर असून गेल्या १९ वर्षांपासून ते दुबईमध्ये राहत आहेत.
एलिजाव्यतिरिक्त आणखी एका भारतीयाचे नशीब या लॉटरीमध्ये फळफळले. या व्यक्तिचे नाव ‘मोहम्मद हनीफ एडम’ असे आहे. याने लकी ड्रॉमध्ये सरप्राइज गिफ्ट म्हणूण मोटारबाईक जिंकली. तो गेली २० वर्ष दुबईमध्ये राहात आहे.