‘मला मरण्यापूर्वी जगायचे आहे. सारे जग फिरायचे आहे’ असे कित्येकांना बोलताना तुम्ही ऐकले असेल. पण असे आयुष्य फार कमी लोकांच्या वाटेला येते. वृद्धापकाळात हळूहळू अनेक आजार जडतात, आजारपणात जगण्याची उमेद मरुन जाते आणि घरातला बिछाना बनतो आपले जग. येथेच उठायचे, येथेच झोपायचे आणि येथेच आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजायच्या. पण आयुष्याचा शेवट असाच का करायचा ? एका ९१ वर्षीय आजीला पडलेला हा प्रश्न. पण तिने यातून मार्ग काढला. आपल्या स्वप्नाप्रमाणे ती जगली अन् जाता जाता सगळ्यांना आयुष्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन देऊन गेली.
९१ वर्षीय नॉर्मा यांना कॅन्सर झाला होता. काही दिवसांत आपला अत्यंत दुर्दैवी मृत्यू होणार हे देखील त्यांना ठाऊक होते. पण बिछान्यावर पडून मृत्यूची वाट बघणे त्यांना काही जमत नव्हते. त्यामुळे त्यांनी ठरवून टाकले आयुष्यातले शेवटचे दिवस हे बिछान्यावर नाही तर फिरण्यात घालवायचे. बस एकच निश्चय करून त्या निघाल्या दिर्घ अशा सहलीला. मुलगा, सून त्या आणि त्यांना साथ देणारी एक गाडी घेऊन त्यांचा शेवटचा प्रवास सुरू झाला. गेल्या वर्षभरात त्यांनी २० हजार किलोमीटरचा प्रवास केला, या प्रवासात अमेरिकेच्या ३१ राज्यांना आणि ७१ ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या. शक्य तेवढे जग नजरेत साठवण्याचा प्रयत्न नॉर्मा आजींचा होता. गेल्या वर्षभराच्या काळात नॉर्वा यांचा हा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा ठरला. ‘मला कॅन्सर झाला असला तरी मला दुदैवी मृत्यू नको आहे, मला हसत खेळत मरणाला सामोरे जायचे आहे. नॉर्वा प्रवासात भेटणा-या सगळ्यांना सांगायच्या. आपल्या फेसबुक अकाऊंटवरून नॉर्वा आपल्या प्रवासाची माहिती सगळ्यांना द्यायच्या, त्यामुळे जगण्याची उमेद देणा-या प्रत्येकाला नॉर्वा आजी माहिती होत्या, पण दोन दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला आणि या आजीला जाणणारे सगळेच हळहळले. हजारो लोकांनी त्यांच्या फेसबुकच्या वॉलवर जाऊन त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहिली आहे