वृद्धापकाळात अनेकांच्या वाटेला येतं ते एकाकी आयुष्य. शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देऊ अशी शपथ घेतली असली तरी दुर्दैवानं सगळ्यांना शेवटपर्यंत एकत्र नांदता येत नाही. शेवटी त्यातला एक कधीना कधी हात सोडून जातोच. तेव्हा वृद्धापकाळात आपल्या जोडीदाराशिवाय एकटं जगण्याचं दु:ख अनेकांच्या वाट्याला येतं.
पण काहीजण या काळातही खचून न जाता जगण्यातली मजा शोधतात. तेव्हा वाईट काळातून जाणाऱ्या प्रत्येकानं या ९४ वर्षांच्या आजोबांबद्दल ऐकलं पाहिजे. केथ डॅव्हिसन यांच्या पत्नींचं कॅन्सरमुळे वर्षभरापूर्वीच निधन झालं. पत्नीच्या निधनानंतर सहाजिकच एकाकी आयुष्य त्यांच्या वाट्याला आलं. घर खायला उठलं होतं, एकटेपणा दिवसेंदिवस जगणं मुश्किल करत होता. पण निराशेत असं किती दिवस जगणार म्हणूनच त्यांनी काहीतरी वेगळं करण्याचं ठरवलं.
केथ यांनी आपल्या अंगणात मोठा स्विमिंगपूल बांधून घेतला. हा स्विमिंग पूल त्यांनी शेजारच्या मुलांसाठी खुला केला. तेव्हा नेहमीच आजूबाजूची लहान मुलं त्यांच्या अंगणात येतात. मनमुराद पाण्यात खेळण्याचा आनंद घेतात. या मुलांना अंगणात खेळताना पाहून केथ यांनाही आनंद मिळतो. अंगणात खुर्चीत बसून ते तासन् तास या मुलांकडे पाहत बसतात. यातच आयुष्याचा खरा आनंद आहे असंही ते म्हणतात. आयुष्य खूप सुंदर आहे फक्त त्यातलं नेमकं सुंदर काय हे शोधता आलं पाहिजे. हेच आजोबांनी शोधलं आणि जगण्याला त्यांनी नवी दिशा मिळवून दिली.