आज गुगलने चिकनपॉक्स म्हणजेच कांजण्यांवरील लसीचा अविष्कार करणाऱ्या डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांना त्यांच्या ९४व्या जयंतीच्या निमित्ताने डुडलच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचा जन्म १७ फेब्रुवारी १०२८ साली जपानच्या ओसाका येथे झाला. त्यांनी ओसाका विद्यापीठातून वैद्यकीय पदवी संपादन केली आणि १९५९ मध्ये ओसाका विद्यापीठाच्या सूक्ष्मजीव रोग संशोधन संस्थेत प्रवेश घेतला. गोवर आणि पोलिओव्हायरसचा अभ्यास केल्यानंतर, डॉ. ताकाहाशी यांनी १९६३ मध्ये युनायटेड स्टेट्समधील बेलर कॉलेजमध्ये संशोधन फेलोशिप स्वीकारली. याच काळात त्यांच्या मुलाला कांजण्या झाल्या. यामुळे त्यांना या आजारावर लस शोधण्यात मदत झाली.
यानंतर १९६५ साली डॉ. ताकाहाशी जपानमध्ये परतले. या काळात त्यांनी प्राणी आणि मानवी ऊतींमध्ये जिवंत परंतु कमकुवत झालेल्या कांजण्यांच्या विषाणूचे संवर्धन करण्यास सुरुवात केली. केवळ पाच वर्षांच्या विकासानंतर ते क्लिनिकल चाचण्यांसाठी तयार होते. १९७४ मध्ये डॉ. ताकाहाशी यांनी या विषाणूला लक्ष्य करणारी पहिली लस विकसित केली. त्यानंतर इम्युनोसप्रेस झालेल्या रुग्णांवर संशोधन करण्यात आले आणि ते अत्यंत प्रभावी असल्याचे आढळून आले.
आज जगभरातील लोक जपानी डॉक्टर मिचियाकी ताकाहाशी यांचे त्यांच्या शोधाबद्दल आभार मानत आहेत. त्यांनी कांजण्यांसारख्या रोगांपासून बचाव करण्याचे काम केले. म्हणूनच त्यांच्या जन्मदिनी गुगलद्वारे डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले आहे. ताकाहाशी यांच्या योगदानासाठी त्यांच्या ९४व्या जयंतीनिमित्ताने गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली दिली आहे. संसर्गजन्य आणि गंभीर आजार असलेल्या रुग्णांवर प्रभावी उपाय म्हणून त्यांनी लसीचा शोध लावला. तेव्हापासून जगभरातील लाखो मुलांचे लसीकरण करण्यात आले आहे.
१९८६ साली, जागतिक आरोग्य संघटनेने मंजूर केलेली एकमेव व्हेरिसेला लस जपानमधील ओसाका विद्यापीठाच्या रिसर्च फाउंडेशन फॉर मायक्रोबायल डिसीजेसने सादर केली. डॉ. ताकाहाशी यांच्याद्वारे तयार करण्यात आलेल्या या लसीचा ८० पेक्षा अधिक देशांमध्ये उपयोग केला गेला. यानंतर १९९४ साली त्यांची ओसाका विद्यापीठात सूक्ष्मजीव रोग अभ्यास गटाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. निवृत्तीपर्यंत ते याच पदावर होते. १६ डिसेंबर २०१३ रोजी त्यांचे निधन झाले.