बौद्धिक कौशल्यावर आधारित बुद्धिबळ हा एक बैठा खेळ आहे. बुद्धिबळ हा दोन खेळाडूंमध्ये रणनीती आणि चातुर्य यांचा उपयोग करून खेळला जाणारा खेळ आहे. काही दिवसांपूर्वी बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने रौप्यपदक पटकावले, तर आता मलेशियातील एका मुलीने बुद्धिबळ खेळाच्या पटाची मांडणी करून विश्वविक्रम केला आहे. एका १० वर्षांच्या मुलीने डोळ्यावर पट्टी बांधून बुद्धिबळाच्या पटावर प्रत्येकी १६ सोगट्यांची मांडणी करून नवा इतिहास रचला आहे.
मलेशियात राहणाऱ्या अवघ्या १० वर्षांच्या मुलीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव कोरलं आहे. तिने ४५.७२ सेकंदात बुद्धिबळाच्या सोगट्यांची मांडणी करून विश्वविक्रम केला आहे. तसेच खास गोष्ट अशी की, यादरम्यान तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. पुनितमलारने तिच्या शाळेत बुद्धिबळ खेळातील हे अनोखे कौशल्य सादर करून दाखवले आहे. हे अनोखे कौशल्य दाखवताना शाळेत पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन साक्षीदार म्हणून उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे.
पोस्ट नक्की बघा :
डोळ्यावर पट्टी बांधून बुद्धिबळाच्या पटाची केली मांडणी :
न बघता बुद्धिबळ पटावर सोंगट्या मांडून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवणाऱ्या मुलीचे नाव पुनितमलार राजशेकर (punithamalar rajashekar) असे आहे. बुद्धिबळाचा खेळ हा खरंतर दोन खेळाडूंमध्ये खेळला जातो आणि अटीतटीचा सामना रंगतो. पण दहा वर्षांच्या मुलीने चक्क ४५.७२ सेकंदात डोळ्यावर पट्टी बांधून प्रत्येकी सोळा सोंगट्या पटावर मांडून विश्वविक्रम केला आहे; जे ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेल. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डशी बोलताना मुलगी म्हणाली, “माझे बाबा माझे प्रशिक्षक आहेत आणि आम्ही जवळजवळ दररोज एकत्र बुद्धिबळाचा खेळ खेळतो.”
पुनितमलारला गणित विषय आवडतो. तसेच भविष्यात तिला शास्त्रज्ञ बनण्याची इच्छा आहे. तसेच तिने अनेक शालेय स्पर्धांमध्येदेखील भाग घेतला आहे आणि आता तिने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या कौशल्याने नाव कोरले आहे आणि विश्वविक्रम केला आहे. तसेच १० वर्षांच्या मुलीच्या अनोख्या कौशल्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि सोशल मीडियावर मुलीच्या विलक्षण पराक्रमाची प्रशंसा केली जात आहे.