अनेक लहान मुलं फादर्स डेच्या निमित्ताने किंवा वाढदिवसानिमित्त वडिलांना सुंदर भेटवस्तू देत असतात. यातून ते आपल्या वडिलांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. पण सध्या एका सहा वर्षांच्या मुलीने तिच्या वडिलांना अशी काही भेट दिली आहे, जी पाहताच वडिलांना धक्का बसला आहे. शिवाय ती भेटवस्तू पाहून मुलीचे वडील संतापले आहेत. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या या मुलीने शाळेतून वडिलांसाठी भेटवस्तू बनवून आणली होती. ज्यामध्ये कागदापासून काही डायस (फासा) बनवले होते. या डायवर अशा सहा गोष्टी लिहिल्या होत्या, ज्या वाचून वडिलांचा खराब मूड चांगला होऊ शकतो.
पण यातील डायसवर धक्कादायक वाक्य लिहिण्यात आलं होतं. शिवाय त्यावर एका बंदुकीच्या गोळीचं चित्र काढण्यात आलं होतं आणि लिहिले होतं, जेव्हा तुम्हाला काय करावे हे समजत नसेल तेव्हा हा पर्याय वापरा. म्हणजे स्वतःला गोळी मारुन घ्या. या प्राथमिक शाळेतील मुलीचे वडील ट्रेंट हॉवर्ड यांनी सांगितलं, “माझ्या सहा वर्षांच्या मुलीला तिच्या शिक्षकाने अशी गोष्ट बनवायला सांगितली जी आत्महत्येस प्रवृत्त करते, हे विचित्र आहे.”
ते पुढे म्हणाले, अशा गोष्टी बनवून देणे अत्यंत चुकीचे आहे. हा मस्करीचा विषय नाही. तर मुलीची आई रेनिया यांनी सांगितले की, मी याबाबत शिक्षकांशी बोलले. तेव्हा त्यांनी सांगितलं की, “ही भेट एक प्रकारची चेष्टा होती आणि दुसरे काही नाही.” तर या प्रकरणावर मानसशास्त्रज्ञ बेली बॉश म्हणाले, “अशा घटनांचा मुलांवर आणि पालकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. मुलांना काही गोष्टी फारशा समजत नाहीत. त्यामुळे अशा गोष्टींचा त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो. एवढेच नव्हे तर मोठ्या लोकांवरही गोळी आणि मृत्यू या शब्दांचा प्रभाव असतो. हे सर्व अशा वेळी घडत आहे जेव्हा ऑस्ट्रेलियातील तरुणांमध्ये मानसिक आजाराची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत.”
हेही पाहा- भरधाव कारमधून डोकं बाहेर काढणं पडलं महागात, क्षणात झाला भयानक अपघात, VIDEO व्हायरल
तर या घटनेबद्दल शाळेने पालकांची माफी मागितल्याचे शिक्षण विभागाने सांगितलं आहे. भविष्यात असे पुन्हा होणार नाही असंही शाळेकडून सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्याध्यापकांनी थेट पालकांशी बोलून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. शिवाय त्यांनीही मुलांच्या पालकांची माफी मागत हा उपक्रम शाळकरी मुलांसाठी योग्य नव्हता असंही मुख्याध्यापकांनी मान्य केलं आहे.