दुचाकी वाहन चालवताना डोक्यावर हेल्मेट घालणे आवश्यक असते हा नियम सगळेच जाणून आहेत. परंतु, काही महिन्यांपासून सोशल मीडियावर विचित्र हेल्मेटचा जणू ट्रेंड आलाय की काय, असा प्रश्न पडतो. मध्यंतरी एकाने पोकेमॉन या कार्टूनमधील पिकाचू नावाच्या कॅरेक्टरचे हेल्मेट घालून गाडी चालवतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. त्याला बघून पोलिसदेखील आश्चर्यचकित झाले होते. आता तसाच काहीसा प्रकार अजून एका व्हायरल व्हिडीओमध्ये झाला आहे. परंतु, या व्हिडीओमध्ये फक्त हेल्मेट हे विशेष आकर्षण नसून, तो तरुण ज्या गोष्टीवर बसून प्रवास करतो आहे, ती बाबच अधिक चर्चेचा विषय बनली आहे.
@bull_rider_007 या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिल्लीमधील एक तरुण सशासारखे दिसणारे कान असलेले एक हेल्मेट घालून, चक्क रेड्याच्या पाठीवर बसून प्रवास करीत आहे, असे दिसते. रेड्याच्या गळ्यात बांधलेल्या दोरीने तो त्यास दिशा देण्याचे काम करतो आहे. असा हा व्हिडीओ शेअर करताना त्याने त्याखाली, “पेट्रोलला त्याची जागा दाखवून दिली..” अशी कॅप्शन लिहिली असून व्हिडीओमध्ये, “पेट्रोल महाग झाले.. मग मी त्याला त्याची जागा दाखवली” असा लिहिलेला मजकूर पाहायला मिळतो.
हेही वाचा : अरेच्चा! हे चक्क बिना अंड्याची, अंडा भुर्जी विकतात? चकित झालात ना? मग हा व्हिडीओ पाहा
या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओला आतापर्यंत ३.९ मिलियन इतके व्ह्युज मिळाले असून, त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. हा व्हिडीओ बघून काहींना प्राण्यांना विनाकारण त्रास दिल्यासारखे वाटत आहे; तर काहींना, पोलिसांनी या तरुणाला अडवले कसे नाही, असा प्रश्न पडला आहे. नेटकऱ्यांना हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून काय वाटते आणि त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते पाहा.
एकाने, “तुम्ही त्यांच्या पाठीवर बसावे म्हणून रेडे बनवले नाहीयेत. प्राण्यांचा छळवाद आहे हा,” असे लिहिले आहे. दुसऱ्याने, “नुसता त्रास आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. “काय स्पीड आहे याचा आणि किती bhp पॉवर देतो?” अशी मिश्कील कमेंट तिसऱ्याने केली आहे. “पेट्रोलपेक्षा जास्त खर्च यावर होत असेल,” असे चौथ्याने सांगितले. तर शेवटी पाचव्याने, “सर्व प्राण्यांचा आदर करावा,” असे लिहिलेले आपल्याला पाहायला मिळेल.
@bull_rider_007 या अकाउंटवर केवळ तो आणि रेडा रस्त्यावरून प्रवास करतानाचे आणि लोकांच्या त्यांच्याकडे बघून काय प्रतिक्रिया असतात यासारखे अनेक व्हिडीओ शेअर केलेले दिसतात.