Passenger Opens Flight Door Mid Air Video Viral : विमान प्रवासा करताना धक्कादायक घटना घडत असल्याचे पुन्हा एकदा एका व्हायरल व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. ब्राझीलच्या एका प्रवाशाने हजारो फूट उंच उडालेल्या विमानाचा एमरजन्सी दरवाजा उघडल्याची घटना घडलीय. आकाशात दरवाजा उघडल्याने सोसाट्याचा वारा विमानात जाऊ लागला आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या विमानाने साऊ लुईस येथून साल्वाडोरसाठी उड्डाण घेतलं होतं.
प्रवाशाने दरवाजा उघडताच दुसऱ्या एकाने हे थरारक दृष्य कॅमेरात कैद केलं. आकाशात विमानाचे उड्डाण सुरु असाताना दरवाजा उघडल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. हा खतरनाक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
गेल्या काही महिन्यांमध्ये विमानप्रवासात अनेक भयंकर घटना घडत असल्याचं समोर आलं होतं. पण आता विमानात जीवघेणा प्रवासही होत असल्याचं या व्हायरल व्हिडीओच्या माध्यामातून पाहायला मिळत आहे. दक्षिण अमेरिकेची प्रसिद्ध गायिका टायरी या विमानातून प्रवास करत असल्याचंही समजते आहे. एक मिनिटांहून कमी वेळासाठी शूट केलेल्या या व्हिडीओत विमान ढगांमधून उडत असल्याचे थरारक दृष्य पाहायला मिळत आहे.
गेल्या महिन्यातही अशाच प्रकारची घटना घडली होती. दक्षिण कोरियाच्या डाएगू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लॅंडिंग होत असताना एशियाना एअरलाईन्सच्या या विमानाचा दरवाजा अचानकपणे उघडला होता. या विमानातून १९४ प्रवासी प्रवास करत होते. विमानात असताना धक्कादायक अनुभव आल्याचं प्रवाशांनी सांगितलं होतं. विमान लॅंडिग करत असताना एका ३० वर्षांच्या तरुणाने दरवाजा उघडल्याची माहिती समोर आली होती.