सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही फोटो मजेशीर असतात, तर काही आपणाला थक्क करणारे असतात. सध्या अशाच एका घटनेचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मांजर उंच इमातीवरुन पडल्यानंतरही सुखरुप असल्याचं दिसत आहे. उंचावरून पडल्यानंतर प्राण्यांना जास्त दुखापत होत नाही आणि झालीच तर ते लवकर बरे होतात, असं म्हटलं जातं, याचेच उदाहरण आता समोर आलं आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोतील ८ किलो वजनाची मांजर सहाव्या मजल्यावरून खाली पडल्यानंतरही ती चमत्कारिकरित्या बचावल्याची घटना समोर आली आहे.
सहाव्या मजल्यावरून पडली मांजर –
वृत्तानुसार, बँकॉक येथील रहिवासी असलेल्या अपिवाट टोयोथाका यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं की, २७ मे रोजी त्यांच्या कारची मागील काच फुटल्याचं दिसलं, यावेळी कारमध्ये एक किरकोळ जखमी झालेली मांजर देखील सापडली, जी सहाव्या मजल्यावरून कारमध्ये पडली होती. फेसबुकवर पोस्ट शेअर करताना अपिवाट यांनी मांजरीसह कारचा फोटोही शेअर केला आहे.
बाल्कनीतून पडली मांजर –
हेही पाहा- काय सांगता! चक्क तिसऱ्या दिवशी मूल रांगायला लागलं; आईपण आश्चर्यचकित, पाहा व्हायरल Video
मांजरीच्या मालकाने सांगितले की, ते आपली बाल्कनी बंद करायला विसरल्यामुळे शिफू नावाची त्यांची मांजर बाहेर गेली, यावेळी ती रेलिंगवरून घसरून खाली पडल्याचा अंदाज देखीलल लावला जात आहे. सहाव्या मजल्यावरून पडूनही मांजर सुखरुप बचावल्यामुळे सर्वांनाच सुखद आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण या मांजरीचे वजन सुमारे आठ किलो होते. या घटनेनंतर मांजरीला डॉक्टरांकडे नेले असता, डॉक्टरांनी सांगितले की, मांजरीला कोणतीही गंभीर जखम झालेली नाही, फक्त काही किरकोळ जखमा झाल्या आहेत, ज्यामध्ये तिच्या नाकाला सूज आली आहे. एक्स-रे तपासणीत मांजरीच्या शरीरात कोणतेही फ्रॅक्चर आढळले नसल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं. टोयोथाका यांनी मांजरीचे फोटो शेअर करत ती सुखरुप असल्याचे सांगितले.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, मांजरीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही याची खात्री करण्यासाठी तिची पूर्ण तपासणी करा. आणखी एका युजरने लिहिलं, “मांजरींची काळजी घेणे आवश्यक आहे, बराच वेळ अस्वस्थ झाल्यामुळे तिने सहाव्या मजल्यावरून उडी मारली असावी”