Viral Video : अनेकदा खिडकीवर एखादा पक्षी किंवा घराबाहेर मांजर किंवा कुत्रा हे प्राणी अन्नाच्या शोधात येतात. तेव्हा आपण त्यांना आपुलकीनं खायला अन्न देतो. ते लक्षात ठेवून दररोज हे प्राणी वा पक्षी त्याच ठिकाणी येऊन आपली वाट बघत राहतात आणि आपल्याकडून प्रेम मिळेल याची अपेक्षा करतात. तर आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. साड्यांचा व्यापार करणाऱ्या एका दुकानदाराकडे एक गाय दररोज जाते आणि दुकानदार या गाईला प्रेम व सन्मान देताना दिसून येतो.
व्हायरल होणारा हा व्हिडीओ रायपूरचा आहे. रायपूर हा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील जिल्हा आहे. रायपूरच्या मार्केटमध्ये एक साड्यांचं दुकान आहे; ज्या दुकानात दररोज एक गाय येते आणि दुकानाच्या गादीवर जाऊन बसते. सुरवातीला व्हिडीओत एक गाय रस्त्यावरून चालत येते आणि पायऱ्या चढून दुकानाच्या आतमध्ये जाताना तुम्हाला दिसेल. ही गाय कोणाचीही भीती न बाळगता, स्वतः दुकानाचा दरवाजा उघडून आत जाताना दिसते आहे. तसेच दुकानदारदेखील गाईला दुकानाच्या बाहेर न काढता, गादीवर बसवताना दिसून आला आहे. तसेच ही गाय दुकानात अर्धा तास बसते आणि मग जाते, असेदेखील या व्हिडीओत सांगण्यात येत आहे. साडीच्या दुकानात दररोज जाणाऱ्या गाईचा हा व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच.
हेही वाचा… महेंद्रसिंग धोनीनं जबरा फॅनला दुचाकीवर दिली लिफ्ट, व्हायरल व्हिडीओनं जिंकली क्रिकेटप्रेमींची मनं
व्हिडीओ नक्की बघा :
सात वर्षांपासून दुकानात दररोज येते एक गाय :
रायपूरच्या महालक्ष्मी मार्केटमधील एका कपड्यांच्या दुकानात सात वर्षांपासून एक गाय दररोज येते. ‘चंद्रमणी’ या नावाने ही गाय ओळखली जाते आणि दुकानमालकही या गाईचे अगदी मनापासून स्वागत करतो. दुपारी ३ ते संध्याकाळी ७ यादरम्यान ही गाय दुकानात येते आणि अर्धा तास किंवा तीन तास बसते. साक्षात लक्ष्मीच्या रूपात ही गाय येते आणि आम्हाला प्रेम व आशीर्वाद देते, असे दुकानदार त्याचे मत व्हिडीओमध्ये व्यक्त करताना दिसून येत आहे. दुकानात साड्यांचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्याकडून गाईला प्रेम आणि सन्मान मिळतो. म्हणूनच सात वर्षांपासून ही गाय दररोज या दुकानात जाते, असे म्हणायला हरकत नाही.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @subhashchand48 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच या युजरचे नाव सुभाषचंद, असे आहे. या युजरने या व्हिडीओत दुकानदाराशी संवाद साधला आहे. आणि ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे; जी अनेकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहे. तसेच व्हिडीओ पाहणारे अनेक जण दुकानदाराला ‘भाग्यशाली’ म्हणत आहेत. तसेच गाईला दुकानात आलेले पाहून, ‘तुमच्या दुकानात ३३ कोटी देवी-देवता बसले आहेत’, असे एक युजर दुकानदाराला बोलताना कमेंटमध्ये दिसून आला आहे. ही अनोखी गोष्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे