दरवर्षीप्रमाणे यंदाही देशभरातील करोडो क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएलचे आयोजन करण्यात आलं आहे. आयपीएलचे सामने पाहण्यासाठी अनेक क्रिकेट चाहते स्टेडियममध्ये जाऊन आणि आपल्या आवडत्या संघाचे समर्थन करत असतात. स्टेडियममधील अनेक घडामोडींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात, आयपीएलशी संबंधित तर दररोज एखादा व्हिडिओ व्हायरल होतच असतो. मग त्यामध्ये एखाद्या चाहत्याने आपल्या आवडत्या खेळाडूसाठी केलेला अनोखा पेहराव असो वा थेट स्टेडियममध्ये घुसून खेळाडूच्या पाया पडतानाच्या व्हिडीओचा समावेश असतो.
मजेशीर गोष्टींसह कधी मैदानावर झालेल्या भांडणाचे व्हिडीओदेखील व्हायरल होत असतात, नुकतंच उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील एकाना इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विराट कोहली आणि लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर या दोघांचा मैदानावर एकमेकांशी भांडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत असतानाच एका सीएसके चाहत्याच्या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याने चीअर लीडर्सना आपल्या इशाऱ्यावर नाचायला लावल्याचं पाहायला मिळत आहे.
…अन् मुलाच्या इशाऱ्यावर थिरकल्या चीअर लीडर्स –
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक CSK चाहत्याच्या इशाऱ्यावर चीअर लीडर्स नाचताना दिसत आहेत. खरं तर, चीअर लीडर्स क्रिकेट सामन्यादरम्यान प्रत्येक मोठ्या शॉटसाठी आणि विकेट पडल्यानंतर त्यांच्या टीमच्या खेळाडूंना चीअर करत असतात. मात्र, या व्हिडीओत चेन्नई सुपर किंग्जचा एक फॅन चीअर लीडर्सनाच त्याच्या इशाऱ्यावर डान्स करायला लावत आहे. जे पाहून अनेकजण त्याचं कौतुक करत आहेत तर अनेकजण हा व्हिडीओ खूप मजेशीर असल्याचं म्हणत आहेत.
व्हायरल व्हिडीओची नेटकऱ्यांना पडली भुरळ –
या व्हायरल व्हिडिओमध्ये, आम्ही चेन्नई सुपर किंग्जची जर्सी घातलेला मुलगा स्टेडियममध्ये नाचत असलेल्या चीअर लीडर्ससमोर डान्स करताना दिसत आहे. त्याचवेळी चीअर लीडर्सही त्याच्या डान्सच्या स्टेप फॉलो करत डान्स करत आहेत. हे पाहून स्टेडियममध्ये उपस्थित क्रिकेट चाहते जोरजोरात शिट्ट्या वाजवत असल्याच व्हिडीओत दिसत आहेत. हा व्हिडिओ नेटकऱ्यांना खूप आवडला असून अनेकजण तो शेअर करत आहेत.