सध्या अनेक जण ऑनलाईन खरेदीला सर्वात जास्त प्राधान्य देतात अशात ऑनलाईन जेवण मागवण्याचे प्रमाणसुद्धा वाढले आहेत. अनेक जण स्विगी, झोमॅटोसारख्या फेमस साइटवरुन आवडीने जेवण मागवतात. ऑनलाईन जेवण कधी खूप चांगल्या प्रतीचे असतात तर कधी या जेवणात झुरळ सापडते तर कधी काही. सध्या एका मुंबईतील व्यक्तीने असाच एका जेवणाचा फोटो एक्सवर शेअर केला आहे. हे जेवण त्याने स्विगीवरुन ऑर्डर केलं होतं. या जेवणात त्याला चक्क औषधाची गोळी सापडली. हे फोटो पाहून कदाचित तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
उज्वल पुरी नावाच्या व्यक्तीने स्विगीवरुन कुलाबा येथील लोकप्रिय लिओपोर्ड येथून ऑयस्टर सॉस चिकन मागवले होते. जेव्हा त्याने हे चिकन खायला घेतले तेव्हा त्याला धक्का बसला कारण त्यात औषधाची गोळी सापडली. एक्सवर या जेवणाचे फोटो शेअर करत उज्वल पुरी लिहितात, ” ख्रिसमसनिमित्त मी स्विगीवरुन कोलाबाच्या लिओपोर्ड येथून जेवण मागवले आणि मला जेवणात अर्धवट शिजलेली औषधीची गोळी मिळाली.” या मध्ये त्यांनी स्विगीच्या अकाउंटला सुद्धा टॅग केले.
उज्वल पुरीच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी स्विगीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. एका युजरने लिहिलेय, “स्विगी हे चुकीचं आहे.अर्धवट शिजवलेले औषध जेवणात सापडले. किमान रेस्टॉरंटला नीट स्वयंपाक करायला सांगा” तर एका युजरने लिहिलेय, “हे स्विगीकडून अपेक्षित नव्हतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “स्विगी हा फक्त सुविधा पुरवणारे माध्यम आहे. त्यामुळे तक्रार ही लिओपोर्ड कॅफेवर व्हायला हवी”
या दरम्यान उज्वल पुरीच्या या पोस्टवर स्विगीने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे. स्विगीने लिहिलेय, ” उज्वल,आम्ही आमच्या रेस्टॉरंट पार्टनर्सकडून चांगल्या अपेक्षा ठेवतो. या बाबत चौकशी करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या.”
हिन्दुस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, उज्वल पुरी यांना स्विगीचा कॉल आला होता आणि त्यांनी माफी सुद्धा मागितली आणि त्यांना या जेवणाचे पैसे परत देणार असल्याचे सुद्धा सांगितले.