Viral Video : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जण त्यांना आपला आदर्श मानतात. त्यांच्या विचारांवर चालतात. अनेक शिवप्रेमी गडकिल्ल्यांना भेट देतात. गडकिल्ल्यांवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात. काही लोक या गडकिल्ल्यांची स्वच्छता करतात तर काही लोक या गडकिल्ल्यांविषयी माहिती सांगतात. महाराजांविषयी आणि गडकिल्ल्यांविषयी आपले प्रेम व्यक्त करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एका तरुणीने आईचा वाढदिवस हटक्या पद्धतीने साजरा केला आहे. ती आईला वाढदिवसानिमित्त राजगडावर घेऊन आलेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की ही तरुणी स्वत: सांगते की ती तिच्या आईला वाढदिवसानिमित्त किल्ले राजगडावर घेऊन आलेली आहे. ती या व्हिडीओद्वारे सांगते, “जय शिवराय, जय शंभूराजे.. आज आईचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त्याने मी आईला राजगडावर घेऊन आलेले आहे. हे बघा. आई ट्रेक करतेय. विशेष म्हणजे प्रत्येक ट्रेक ला मी माझे ओझे कोणाकडे देत असते पण हे बघा आज जबाबदारीने सर्व ओझं घेऊन चालले आहे. पाठीमागे बॅग आहे, समोर बॅग आहे. खाली मला व्हिडीओ घ्यायचे होते पण मुद्दामहून घेतले नाही. म्हटलं नको व्हिडीओ वैगरे. नॉर्मल आलोय. आईला गड दाखवून परतीचा प्रवास सुरू करू. एक म्हटलं की आपण आईचा वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये जातो किंवा पार्टीला वैगरे जातो ते न करता जर आपण आपल्या आईवडिलांना महाराजांचे गडकिल्ले दाखवा.”
ती पुढे सांगते, “मला एकच म्हणायचं आहे की मी काही दिखावा करत नाही किंवा तुम्हाला काही वेगळं सांगत नाही पण प्रत्येकाने आपल्या महाराजांचे गडकिल्ले आपल्या आईवडिलांना दाखवले पाहिजे. आता तिला घेऊन आली आहे. ५७ वा वाढदिवस आहे कदाचित आईचा हा. मलापण फिक्स माहीत नाही तर भेटू या आपण गडावर. जय शिवराय, जय शंभूराजे.”
पाहा व्हायरल व्हिडीओ
_divya_0418 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पहिल्यांदा आई ला घेऊन आली राज्यांच्या प्रिय राजगडावर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्य ती आई जिच्या पोटी तुझ्यासारख्या वाघिणीनं जन्म घेतला आहे..” तर एका युजरने लिहिलेय, “मी पण माझ्या आईला प्रतापगडावर घेऊन गेलो होतो तिच्या जन्म दिनाच्या दिवशी. किती छान होतं अनुभव आणि तिच्या चेहऱ्यावरील आनंद…” आणखी एका युजरने लिहिलेय, “आईसाठी सर्वात मोठं गिफ्ट हेच राहिलं” एक युजर लिहितो, “हि खरी जिजाऊंची वाघीण” तर एक युजर लिहितो, “दीदी तुझ्या कार्याला सलाम” एक लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला असून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.