सेल्फी घेण्याच्या नादात अनेकदा लोक स्वत:चा जीव धोक्यात घालतात. या बाबतचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सेल्फीच्या नादात एका तरुणाने आपला जीव धोक्यात घातला आहे. व्हायरल व्हिडीओतील घटना उत्तराखंडमधील केदारनाथ धाम येथे गुजरातच्या यात्रेकरूबरोबर घडली आहे. केदारनाथ धाम येथे दर्शनासाठी पायी ट्रॅकवरून चढत असताना हा तरुण सेल्फी काढायला गेला आणि मंदाकिनी नदीच्या वाहत्या पाण्यात पडला. सुदैवाने नदीत पडताच तो एका मोठ्या दगडात अडकला आणि तो तिथेच बसून राहिला ज्यामुळे पाण्याच्या प्रवाहातून वाहत जाण्यापासून तो बचावला.
तरुण पाण्यात पडल्यानंतर अनेक तास वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या मध्यभागी अडकून पडला होता. या घटनेनंतर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एसडीआरएफ) जवानांच्या मदतीने स्थानिक लोकांनी त्या तरुणाला पाण्यातून बाहेर काढले आणि त्याचा जीव वाचवला. ज्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुलावरून नदीत पडला तरुण-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुजरातमधील एक तरुण केदारनाथ धामच्या दर्शनासाठी आला होता. यावेळी त्याने सोमवारी गौरीकुंड ते केदारनाथ धाम पायी चढण्यास सुरुवात केली होती. दुपारी तो रामबारा या चढणीच्या मधल्या पायथ्याशी पोहोचला, येथील लोखंडी पुलावरुन मंदाकिनी नदीच्या पलीकडे जावे लागते. हा तरुण पूल ओलांडत असताना त्याने नदीच्या प्रवाहाबरोबर सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी सेल्फीच्या नादात जास्त वाकल्याने त्याचा पाय घसरला आणि तोल गेल्याने तो थेट मंदाकिनी नदीत पडला.
हा तरुण नदीत पडल्यानंतर सुदैवाने तो पाण्याच्या प्रवावाहून वाहत जाण्याऐवजी एका मोठ्या दगडात अडकला आणि तो त्या दगडावरतीच चढून बसला. जीवाच्या भीतीने त्याने मदतीसाठी आरडाओरडा सुरू केली, परंतु नदीच्या प्रचंड प्रवाहामुळे त्याला कोणीही मदत करू शकले नाही. यावेळी नदीच्या पाण्याच्या पातळीत वारंवार वाढ आणि घट होत असल्याने तरुणाचा वाहून जाण्याचा धोका देखील होता.
एसडीआरएफच्या जवानांनी वाचवला तरुणाचा जीव –
रुद्रप्रयाग जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षक विशाखा भदाणे यांनी सांगितले की, लोकांनी नदीत तरुण अडकल्याची माहिती रामबाडा स्टेशनवर तैनात असलेल्या एसडीआरएफ टीमला दिली. यानंतर एसडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दोरीच्या सहाय्याने नदीच्या प्रवाहात उतरून तरुणाची सुटका केली.