Viral Video : अनेकदा दुकानातून विकत घेतलेल्या प्लास्टिकच्या बाटलीचा उपयोग आपण झाडे लावण्यासाठी करतो आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी एक पाऊल पुढे उचलतो. कचरा कमी करण्यासाठी रिसायकलिंग हे एक महत्त्वाचे धोरण आहे. आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहायला मिळाले आहे. बंगळुरू मेट्रोपॉलिटन ट्रान्स्पोर्ट कॉर्पोरेशनने (BMTC) त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एका टाकाऊ जुन्या बसचे कॅन्टीनमध्ये (उपाहारगृह) रूपांतर केले आहे.
जुन्या बसचे कॅन्टीनमध्ये रूपांतर होण्यापूर्वी बसने एकूण १०,६४,२९८ किमीचा प्रवास केला. तसेच या बसचे कॅन्टीन बनविण्याच्या प्रयत्नात बस आगारातील चार कर्मचाऱ्यांचा हातभार आहे. हे चालते-फिरते कॅन्टीन विविध ठिकाणी सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणासाठी सेवा उपलब्ध करून देण्याचे काम करणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा खास व्हिडीओ.
व्हिडीओ नक्की बघा :
तुम्ही या व्हिडीओत पाहिले असेल की, अधिकाऱ्याने कॅन्टीनच्या व्हेंटिलेशन आणि लायटिंग सिस्टीमची काळजीपूर्वक रचना केली आहे. त्यामध्ये खुर्च्या, टेबल व्यवस्था, पंखा, सोईस्कर वॉश बेसिन अशा सुविधा आहेत. त्याव्यतिरिक्त कॅन्टीन पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसह सुसज्ज आहे. या कॅन्टीनच्या छतावर काचेच्या खिडक्या लावण्यात आल्या आहेत. त्याशिवाय बसच्या दोन्ही बाजू अतिरिक्त व्हेंटिलेशन आणि प्रकाश व्यवस्थांनी सुसज्ज आहेत; ज्यामुळे वापरकर्त्यांसाठी आनंददायी वातावरण निर्माण होईल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @thebangalore360 आणि @ChristinMP यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून या खास उपक्रमाचे आणि कॅन्टीनच्या रचनेचे कमेंट्समध्ये कौतुक करताना दिसून आले आहेत. एकंदरीतच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.