Viral Video: प्रत्येकाची एक बकेट लिस्ट म्हणजेच स्वप्नांची यादी तयार असते. या यादीत आयुष्यात कोणत्या गोष्टी करायच्या हे आपण आधीच ठरवून ठेवलेले असते. पण, ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत व संयमसुद्धा ठेवावा लागतो. अनेक प्रयत्नांनी जेव्हा बकेट लिस्टमधलं सामान्य माणसाचं एखादं स्वप्न पूर्ण होतं, तेव्हा मात्र आपला आनंद गगनात मावत नाही. तर याचं एक उत्तम उदाहरण सोशल मीडियावर पाहायला मिळालं आहे.
खूप मेहनत करून जेव्हा आपण हक्काचे घर किंवा गाडी खरेदी करतो, तेव्हा आठवण म्हणून नवीन गाडीचा फोटो, तर नवीन घराची पूजा करतो आणि आनंदाची बातमी सोशल मीडियावरही शेअर करतो. तर आज व्हायरल व्हिडीओतसुद्धा एका व्यक्तीचे रिक्षा विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. नवीन रिक्षा खरेदी केल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहे. पण, रिक्षा खरेदी केल्यावर त्याने आणखीन एक खास गोष्ट केली आहे, जी व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, रिक्षाचालकाने एक नवी कोरी रिक्षा खरेदी केली आहे. रस्त्याकडेला ही नवीन रिक्षा उभी केली व गुडघे जमिनीवर टेकून स्वतःच्या फोनमध्ये रिक्षाबरोबर सेल्फी काढताना दिसून आला आहे. तेथे उपस्थित एका अज्ञात व्यक्तीने हा क्षण त्याच्या मोबाइलमध्ये रेकॉर्ड करून घेतला आहे आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Gulzar_sahab या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘कष्ट करून एखादी वस्तू विकत घेण्याचा एक वेगळाच आनंद असतो’, अशी कॅप्शन त्याने व्हिडीओला दिली आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून भावूक होत आहेत. काही जण रिक्षाचालकाचे अभिनंदन करताना तर अनेक जण ‘मेहनतीचं फळ मिळालं’, ‘आपल्याकडे आहे त्या गोष्टीचा आनंद घेता आला पाहिजे’, असे म्हणताना दिसत आहेत; तर अनेक जण इमोजी (Emojie) शेअर करून आनंद व्यक्त करतानाही कमेंटमध्ये दिसून आले आहेत.