Viral Video : प्राणीप्रेमी असणारे अनेक जण त्यांच्या आवडीनुसार घरात विविध प्राणी पाळतात. मांजर, कुत्रा, कासव, ससा आदी अनेक प्राण्यांना आवडीने घरी घेऊन येतात आणि त्यांची काळजी घेतात. घरात राहणारे पाळीव प्राणी कुटुंबातील एका सदस्याप्रमाणेच असतात. आतापर्यंत तुम्ही प्राण्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचं किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी त्यांना छान कपडे घालून तयार करण्यात आलेलं पाहिलं असेल. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ पाहायला मिळाला आहे; ज्यात एका कुटुंबानं चक्क श्वान जोडप्यासाठी ‘डोहाळजेवण’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
पाळीव प्राण्याच्या पालकांनी या श्वान जोडप्याचं नाव रोझी आणि रेमो (Rosy & Remo ) असं ठेवलं आहे. तसेच रोझी आई होणार आहे हे कळताच कुटुंबातील सदस्यांनी तिचं डोहाळजेवण करण्याचं ठरवलं. डोहाळजेवणासाठी सगळ्यात आधी महिला रोझीच्या शरीरावर लाल रंगाची ओढणी गुंडाळते आणि लाल टिकली लावून, तिच्या पायांत बांगड्यासुद्धा घालते आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा तिच्यावर वर्षाव करते. नंतर तिच्या आवडीचं अन्न तिला खाऊ घालते. तसेच आई होण्यासाठी ‘मी तयार आहे’ (I am Ready) अशी इंग्रजी अक्षरांत लिहिलेली पाटी रोझीसमोर ठेवलेली तुम्हाला दिसेल. पाळीव प्राण्याच्या डोहाळजेवणाचा हा हृदयस्पर्शी व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघाच.
व्हिडीओ नक्की बघा :
रोझी आणि रेमोचे (Rosy & Remo ) खास डोहाळजेवण :
पाळीव प्राण्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान देण्यात आला आहे आणि अगदी माणसांसारखे या खास पाळीव प्राण्यांच्या जोडप्याचं डोहाळजेवण आयोजित करण्यात आलं आहे. घरातील पलंगाची फुलांच्या माळांनी सजावट केली आहे आणि पलंगावर रोझी व रेमोला बसवण्यात आलं आहे. श्वान जोडप्यासमोर काही संदेश लिहिलेल्या पाट्यादेखील ठेवण्यात आल्या आहेत. तसेच रोझीदेखील या क्षणाचा पुरेपूर आनंद घेताना व्हिडीओत दिसतं आहे. आजवर तुम्ही प्राण्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील; पण प्राण्यांच्या डोहाळजेवणाचा हा अनोखा कार्यक्रम तुम्ही आजवर पाहिला नसेल.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @rosyremotheretriver या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकरी श्वान जोडप्याला शुभेच्छा देत आहेत. तर, काही जण ‘हे आधी कधीच पाहिलं नव्हतं… खूप मस्त आहे’, ‘इंटरनेटवरील सर्वांत सुंदर व्हिडीओ’ अशा शब्दांत अनेक जण कमेंट करताना व्हिडीओखाली दिसून आले आहेत.