सध्या विमान प्रवास करतानाच्या अनेक चांगल्या वाईट बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्यामध्ये काही प्रवाशांनी विमानात गैरवर्तणुक केल्याच्या होत्या तर काही चांगल्या घटनाही व्हायरल झाल्या होत्या. नुकतेच एअर इंडियाच्या हैद्राबाद-मुंबई विमान प्रवासादरम्यान एका तरुणाने आपल्या प्रेयसीला अनोख्या अंदाजात प्रपोज केल्याच्या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अशातच आता आणखी एक विमान प्रवासादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हाला हसू आवरण कठीण होणार आहे.
तुम्ही जर सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असाल तर काही दिवसांपासून विमान प्रवासादरम्यान व्हायरल होणारे व्हिडीओ नक्कीच पाहिले असतील. अशातच आता एका प्रवाशाने विमानात असं काही केलं आहे, जे याआधी कधीही झालं नसेल. हो कारण या प्रवाशाने चक्क गुटखा थुंकण्यासाठी विमानाची खिडकी उघडण्याची विनंती एअर होस्टेसला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय प्रवाशाची अजब मागणी ऐकून या एअर होस्टेसलाही आपलं हसू आवरता न आल्याचं व्हिडीओत दिसत आहे.
हेही पाहा- Video: भांडी धुण्यास नकार, शिक्षिकेची विद्यार्थिनीला अमानुष मारहाण, संतापजनक घटना कॅमेऱ्यात कैद
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये विमानात प्रवासी बसलेले दिसत आहेत. शिवाय विमानाने उंच आकाशात उड्डाण घेतल्याचंही दिसत आहे. अशातच एक प्रवासी एअर होस्टेसला हातातील तंबाखू चोळत बोलावत असल्याचं दिसत आहे. प्रवाशाचा आवाज ऐकून एअर होस्टेसही त्याच्याजवळ येते आणि ती काही विचारायच्या आधीच तंबाखू चोळत असलेला प्रवासी या एअर होस्टेसला, ‘खिडकी उघडा, मला गुटखा थुंकायचा आहे.’ असं म्हणतो. प्रवाशाची अनोखी मागणी ऐकून एअर होस्टेसला प्रवाशासमोरच हसायला लागल्याचंही दिसत आहे.
या प्रवाशाच्या मागणीनंतर विमानातील अन्य प्रवासीदेखील जोरजोरात हसू लागले. या गमतीशीर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ videonation.teb नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. शिवाय हा व्हिडीओ केवळ रील बनवण्याच्या उद्देशाने बनवण्यात आल्याच व्हिडीओ पाहिल्यानंतर जाणवत आहे.मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा विमान प्रवासाची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.